Saturday 16 January 2016

जन्म मानवाचा

या जीवसृष्टीमध्ये माणसाला जर कशाने वेगळेपण प्राप्त झालं असेल , तर ते विचारशक्तीमुळे ; आणि आपले विचार व्यक्त करण्याच्या सामर्थ्यामुळे !!! आणि मुळात माणसाला या सर्व गोष्टी शक्य होतात , त्याच्या मनामुळे…

आजच्या विज्ञान युगात जन्म-पुनर्जन्म , मोक्ष , अवतार या संकल्पनांवर प्रत्येकाचाच विश्वास असतो असं नाही. विश्वास ठेवायची गरज आहे असंही मला वाटंत नाही. पण या पलीकडे निदान आपण स्वतःपुरता practical विचार केला , तर आपण एक गोष्ट स्वतःला विचारू शकतो , की ' खरंच माणसाचा जन्म मिळून आपण काय केलं ? '

'कोट्यवधी जगतात जिवाणू , जगती अन् मरती
जशी ती गवताची पाती'

हे या जीवसृष्टीचं वास्तव आहे. या असंख्य जीवजंतूं प्रमाणेच आपणही जन्माला आलो , जगलो आणि कालांतराने मरून गेलो ; तर आपल्यात आणि त्या जीवजंतूंमध्ये फरक तो काय ? आपण आपल्या आयुष्यात असं काहीतरी केलं पाहिजे , की ज्याचा कुणाला तरी 'चांगल्या अर्थाने' उपयोग होईल !!! तरच खर्‍या अर्थाने आपल्या जन्माचं सार्थक होईल.

मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे आपले सर्व क्रियाव्यापार मनाच्या अखत्यारीत येतात.
म्हणूनच समर्थ रामदास म्हणतात ,

' देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी |
मना सज्जना हेची क्रीया करावी ||
मना चंदनाचेपरी त्वां झिजावे |
परी सर्व लोकांसी रे नीववावे || '

पण , मित्रहो . . .
हे सगळं एकदम आदर्शवत् वाटतं ना !!!

प्रत्यक्षात सगळीच माणसं काही संत नसतात ना !!!
आयुर्वेदानुसार सत्व , रज आणि तम हे मनाचे तीन गुण आहेत.
तीनही गोष्टींच्या कमी-अधिक प्रमाणानुसार प्रत्येक माणसाचा स्वभाव बदलतो. आणि वास्तवातही हेच बघायला मिळतं.  आजच्या काळात तर माणूस फक्त स्वतःपुरताच विचार करायला लागलाय ! त्यामुळे सहाजिकच मानाच्या गुणांपेक्षा दोषच वाढायला लागल्येत… लोभ , ईर्ष्या , द्वेष , मत्सर , क्रोध हा मानस दोष आहेत. आणि आज आपण फक्त आणि फक्त हे दोषच जोपासतोय…

तटस्थपणे 'माणूस' या सामन्य संकल्पनेचं आजचं विवरण करायचं म्हटलं , तर आपल्याला काय दिसतं ?????
वाटल्यास आपण आध्यात्मिक किंवा मीमांसक भाषा बाजुला ठेवून प्रत्येकाला पटेल अशा साध्या सोप्या भाषेत विचार करू !!!!
काय असतं आपलं आयुष्य ? माणसाला कळायला लागल्या पासून त्याची इतरांशी स्पर्धा सुरू होते. स्पर्धा म्हटली की हार-जीत आली , तुलना आली… तुलना झाली की ईर्ष्या आली. त्यातून द्वेष , निराशा ; स्वार्थीपणात वाढ , बदल्याची भावना…… हे सगळं दुष्टचक्र आपोआपच सुरू होतं. आणि आपण आपल्या मनाच्या चांगल्या गुणांपेक्षा वाईट गोष्टीच वाढवत असतो.

-----x-----x-----x-----x-----x-----

एखाद्या माणसाने आपलं आयुष्य फक्त दुसर्‍यांना मदत करण्यासाठी घालवायचं ठरवलं , तरीही आयुष्य कमी पडेल अशी सध्याची परिस्थिती आहे. मग ते निसर्ग संवर्धन असो , इतर प्राणीमात्रांची सेवा असो किंवा समाजातील गरजू माणसांना मदत करणं असो… करणार्‍याला चांगल्या कामांची कमतरता नाही.


पण माणूस प्रत्यक्षात काय करतो ? माणूस केवळ स्वतःसाठीच जगतो. आत्मकेंद्री स्वभावामुळे दुसर्‍याची अवहेलना करतो. गर्व करतो. पण , या आत्मकेंद्री विश्वातच जर जगायचं असेल , तर त्या माणसाचा जन्म व्यर्थ आहे. माणसाला नेहमी असंच वाटंत असतं , जगात मीच एकटा शहाणा… म्हणूनच आपण नेहमी इतरांच्या चुका काढत असतो. काहीजण आपण मोठे दानशूर किंवा समाजसेवक असल्याचा आव आणतात . प्रत्यक्षात मात्र , कुणावर उपकार करण्याची वेळ आल्यावर असे लोक काहीतरी कारणं सांगून तेथून पळ काढतात. अशा प्रकारे स्वतःला सज्जन म्हणवून घेणार्‍या , परंतू  उक्ती आणि कृतीत फरक असणार्‍या माणसांचा जन्म व्यर्थ आहे !!!!!

आपल्यापैकी बर्‍याच लोकांना आपल्या ज्ञानाचा गर्व असतो. प्रत्येक चांगल्या गोष्टींचं श्रेय घेण्यासाठी त्यांची धडपड सुरू असते. आत्मकेंद्री स्वभावामुळे असे लोक इतरांना दुय्यम वागणूक देतात. यापैकी बर्‍याच जणांचा आविर्भाव तर असा असतो , की जणू काही हा राजा , आणि बाकीचे लोक त्याचे नोकरच आहेत !!!!! अशा लोकांपेक्षा इतर कुणी थोडी जरी प्रगती केली , तरी यांचा जळफळाट होतो. थोडक्यात काय , तर अंगी असलेल्या ज्या काही थोड्याफार चांगल्या गोष्टींमुळे हे लोक माजलेले असतात , ते so called सद्गुण त्यांच्या वागणुकीमुळे काहीच उपयोगी नसतात. अशा माणसांचा जन्मही व्यर्थच आहे !!!!!

आपण जरा जरी आसपासच्या निसर्गाचं निरीक्षण केलं , तरी परोपकार म्हणजे काय , हे आपल्याला शिकता येईल !!!

' परोपकाराय फलन्ति वृक्षाः | परोपकाराय वहन्ति नद्यः |
परोपकाराय दुहन्ति गावः | परोपकारार्थमिदं शरीरम् || '

असं एक संस्कृत सुभाषित आहे. म्हणजेच , झाडं इतरांना फळं , फुलं , सावली  आणि बरंच काही देतात… नदी आपल्या पाण्याने जगाचं पोषण करते… गाई आपलं दूध विना तक्रार माणसाला काढू देतात… आणि माणूस मात्र आपल्या नातलगांनाही आपला फायदा होऊ देत नाही... मग अशा माणसाचा , माणूस म्हणून जन्म व्यर्थच नाही का……..


मित्रहो , याच विषयावर माझी एक कविता आहे… ती सोबत शेअर करत आहे...
हा ब्लॉग आणि ही कविता दोन्ही गोष्टी आपणाला कशा वाटल्या , ते नक्की कळवा…

© डॉ. अमेय गोखले ,
   रत्नागिरी.
9422662772.

No comments:

Post a Comment