Monday 4 January 2016

गझलची तोंड ओळख - भाग ४

गझलची तोंड ओळख - भाग 4

✒संकलन : डॉ. अमेय गोखले. ✒
 आजचे गझल वृत्त :
        विद्युल्लता
 एकूण मात्रा : 22
♻ लगावली (लघु , गुरू क्रम)
गा गा ल गा ल गा गा गा गा ल गा ल गा
2  2  1  2  1  2  2  2  2  1  2  1  2
= 22
(गा - गुरू , ल -लघु)

 आता उदाहरणे पाहू :

बाजारच्या दिशेने , ते सर्व धावले
मी एकटाच वेडा , हे पाय थांबले
माझी दिशा निराळी , मी जाणले उरी
पाठीवरील ओझे , मी दूर फेकले
डोळे वटारुनी ते , बोलाविती मला
त्या थोर शाहण्यांनी , मज शाप घातले
कोलाहलात रत्ने , ते मोजिती तिथे
मी सांगतो फुलांना , हितगूज आतले
        (मंगेश पाडगावकर)

सारी खुली गटारे , खाऊ तरी कुठे ?
सार्‍याच बंद वाटा , जाऊ तरी कुठे ?
सारेच झिंगलेले , गुर्मीत आपल्या
माझे उदास गाणे , गाऊ तरी कुठे ?
झाली हवा विषारी , अन् प्राण कोंडला
मी श्वास मोकळा हा , घेऊ तरी कुठे ?
माझ्याच भोवताली , धरणी दुभंगली
हे प्राण वाचवाया , धाऊ तर कुठे ?
तो देवही अताशा , घेतोय वर्गणी
विश्वास आंधळा मी , ठेऊ तरी कुठे ?
       (कवी डॉ. अमेय गोखले)

विझते जळात जेव्हा , आभाळ शेंदरी
मी पोचते मनाने , तेव्हा तुझ्या घरी
पानांत पाखरांची , किलबील मालवे
वार्‍यावरी तरंगे , ती शीळ कापरी
चेटूक सावल्यांचे , घेरीत ये जिवा
जाती मिटून वाटा , सार्‍या अधांतरी
तिमिरात ओळखीच्या , पुसुनी जुन्या खुणा
अनिवार एकलेपण , दाटून ये उरी
            (शांता शेळके)

वेड्या फुलाप्रमाणे , उमलून यायचे
आयुष्य हे सुगंधी , उधळून द्यायचे…
चोहीकडे जरीही , अंधार दाटला
स्वतः दिवा बनोनी , उजळून जायचे…
दिसता अनाथ पंगू , वाटेवरी कुणी
देऊन हात त्याला , उचलून घ्यायचे…
थोड्या पराभवाने , व्हावे निराश का ?
मिळवून जिद्द पुन्हा , उसळून यायचे…
आयुष्य गूढ कोडे , सुटले कधी कुणा ?
थोडे तरी परंतू , उकलून जायचे…
      (कवी डॉ. अमेय गोखले)

एकांत एक साथी , घेऊन चाललो
काळोख खिन्न हाती , घेऊन चाललो
माझ्याच पावलांचा , आवाज ये मला
ही शून्यता सभोती , घेऊन चाललो
आश्वासने दिव्यांची , गेली विझून ती
थिजल्या उदास वाती , घेऊन चाललो
ओतून मद्यपात्रे , नच दाह थांबला
मी आग ही प्रमाथी , घेऊन चाललो
माझ्याच प्राक्तनाशी , दावा असा उभा
हा भार सर्व माथी , घेऊन चाललो
         (मंगेश पाडगावकर)

✒ संकलन : डॉ. अमेय गोखले.


No comments:

Post a Comment