Thursday 7 January 2016

मेरी आवाज़ ही, पहचान है गर याद रहे

👉दिवस - ७वा
👉लेखक - प्रशांत दांडेकर

मेरी आवाज़ ही, पहचान है गर याद रहे

लतादीदींवर लिहिणे म्हणजे फार कर्मकठीण काम! कारण सुरुवात कुठून करायची व शेवट कुठे हेच लेखकाला सुचत नाही. लतादीदी नावाची दंतकथा रसिकांनी पारायणे करावीत तशी कित्येकदा ऐकली आहे, वाचली आहे. तरीदेखील दीदी दरवेळी भेटतात तेव्हा आगळ्यावेगळ्याच भासतात. लताने गायलेली भूपाळी व तिनेच गायलेली लोरी ऐकून कित्येकांच्या घरातील रेडियो आज ही चालू व बंद होतात.

लतादीदी या वर्षी ८६ वर्षांच्या होतील. पण रसिकांना सांगितले की त्यांची सर्वोत्तम ८६ गाणी निवडा तर त्यांची अवस्था मयसभेतील दुर्योधानासारखी होईल. प्राजक्ताच्या फुलांनी ओंजळ भरताना, अधाशासारखी अजून काही फुले वेचावीत म्हणून आपण प्रयत्न करावेत व नवीन फुले वेचताना ओंजळीतील आधीच गोळा केलेली फुले खालती पडवीत असे काहीसे माझे लता दीदींची निवडक गाणी वेचताना होते.

मदन मोहन यांचे 'लग जा गले' घ्यावे कि खय्याम यांचे'ए दिले नादान' घ्यावे; जयदेव यांचे 'अल्ला तेरो नाम'घ्यावे कि सी रामचंद्र यांचे 'धीरेसे आजा रे अखियनमें' वेचावे काहीच कळत नाही.

सलिल चौधरी यांचे 'आजा रे परदेसी', रोशन यांचे 'रहे ना रहे हम', नौशाद यांचे 'प्यार किया तो डरना क्या', खेमचंद प्रकाश यांचे 'आयेगा, आयेगा आनेवाला', गुलाम मोहम्मद यांचे 'थाडे रहियो बाँके यार ', शंकर जयकिशन यांचे, 'अजीब दास्ताँ है ये, कहाँ शुरू कहाँ ख़तम', हेमंत कुमार यांचे 'वो बेकरार दिल', राहुल देव बर्मन यांचे 'का जानू सजन, तेरे बिना जिंदगी से कोई, शिकवा तो नहीं शिकवा नहीं', यासारखी अनेक सुरमयी फुले आपल्या ओंजळीत असावीच असावी असे माझ्या सारख्या प्रत्येक रसिकाला वाटणे स्वाभाविकच आहे

लता लहानपणी खूपच लाजाळू होती. स्वतःच्या वडिलांसमोर पण गायला मागायची नाही, नेहमी काही तरी बहाणे करायची व गाणे टाळायची. हे तिचे वागणे हेरून एकदा मास्टर दिनानाथ यांनी तिला जवळ बोलाविले व समजाविले की, मी तुझा केवळ पिताच नाही तर गुरु देखील आहे. त्यामुळे पुढे जाऊन असे काही गाऊन दाखव कि एका गुरूला त्याच्या शिष्येमुळे शरमिंदा न व्हावे लागेल. लताच्या मनात ते बोल खोलवर कोरले गेले. सोलापूरला एकदा मास्टर दिनानाथ यांचा जाहीर कार्यक्रम होता. त्यांना गाण्यासाठी गर्दीतून फर्माईश होऊ लागली तेव्हा एक आवाज ऐकू आला, "बाबा, मी गाऊ का गाणे?" हा प्रश्न होता ९ वर्षाच्या छोट्या लताचा. त्या दिवसापासून बाबांच्या पुढ्यात पण लाजणारी लता सभा धीट झाली व मैफिली, स्टेज शो गाजवू लागली.

लता मंगेशकर खऱ्या अर्थाने सर्वप्रथम प्रसिद्धीस आल्या ते 'महल' चित्रपटाच्या गाण्यांमुळे. खेमचंद प्रकाश यांनी नूरजहान, शमशाद बेगम अशा नावाजलेल्या गायिकांना संधी न देता लता ला संधी दिली होती. लताचा आवाज पातळ असल्याने त्याकाळच्या रसिकांना तो कितपत आवडेल असा सर्वांनाच प्रश्न पडला होता. 'महल'च्या रेकॉर्ड्स वर म्हणूनच लताचे नाव छापायचे नाही असा निर्णय घेण्यात आला. त्या ऐवजी मधुबालाचे चित्रपटातील 'कामिनी' नाव गायिकेचे नाव म्हणून लावण्यात आले. पण 'आयेगा; आयेगा आनेवाला' या गाण्याने लोकप्रियतेचे सर्व उच्चांक मोडले. अशावेळी लताला त्याचे श्रेय द्यायलाच हवे असे सर्वांना वाटू लागले. मग रेकॉर्ड्स वर लताचे नाव गायिका म्हणून सन्मानाने विराजमान झाले    

लता दीदींचा स्वर म्हणजे निव्वळ स्वर्गीयच. अंतिम इच्छा म्हणून दीदींचे गाणे ऐकायला मिळावे व मगच जग सोडावे ही केवळ अतिशयोक्ती नव्हे तर हकीकत असायची. १९७१ च्या युद्धात जवानांचा हौसला वाढविण्यासाठी लता व त्यांचे धाकटे बंधू हृदयनाथ, जवानांसाठी गाण्याचे प्रोग्राम करत फिरत होते. युध्द सुरु असताना चव्हाण नावाचा एक जवान स्फोटामध्ये भाजला होता. त्याचे संपूर्ण शरीर भाजले होते पण चेहरा मात्र शाबूत होता. एरवी कोणी जास्त आजारी असले की त्याची वेदना पाहणे देखील सहन होत नाही म्हणून भेटण्यासाठी न जाणारी दीदी, जवानाला मात्र भेटायला गेली. तेव्हा त्या शूर जवानाने लता दीदी यांना सांगितले, दीदी, माझे संपूर्ण शरीर भाजले असल्याने मला दुखा:च्या काहीच संवेदना जाणवत नाहीत, पण माझी एकच संवेदना जागृत आहे, ती म्हणजे तुमचे गाणे ऐकण्याची! लतादीदीने तिच्या सुरेल आवाजात एका गाजलेल्या गाण्याचा पहिला मुखडा सादर केला आणि दुसरा मुखडा गायला लागणार तेवढ्यात डॉक्टरांनी दिदीचा हात दाबला. डॉक्टर म्हणाले,"जवानाचे डोळे उघडे आहेत, मात्र त्याने प्राण सोडले आहेत.

लता दीदी आपण काय शब्द उच्चारणार आहोत, काय गीत गाणार आहोत या बद्दल खूप जागरूक असायच्या. एखादाही अश्लील शब्द किंवा साधा सरळसोट शब्द पण कामुक अर्थ सुचित करणारा असेल तर तो आपल्या गीतामध्ये नसावा असा त्यांचा अट्टाहास असायचा. याच आग्रहामुळे एकदा संगीतकार राजेश रोशन यांना फटका बसला. 'वादा न तोड' या गाण्यामध्ये मेरी चढती जवानी तडपे असे शब्द असल्याने दिदींनी हे गाणे गायला सपशेल नकार दिला. पण राजेश रोशन हार मानणारयांपैकी थोडेच होते! त्यांनी लता दीदींना आपल्या वडिलांच्या एका प्रसिद्ध गाण्याची आठवण करून दिली. चित्रलेखा मधील गाणे 'ए री जाने ना दुंगी' या मध्ये पण काही सूचक शब्द होते जसे की 'सेज सजाओ मेरे साजन की, ले आओ कलियाँ गूँद गूँद'. राजेश रोशन म्हणाले, "लताजी तुम्ही हे जर शब्द असलेले गाणे माझ्या बाबांसाठी गाऊ शकता तर हे गाणे माझ्यासाठी का गाऊ शकत नाही" असा बिनतोड प्रश्न विचारताच लताजी फक्त हसल्या व म्हणाल्या," ज्युनिअर रोशन ठीक आहे, मी गाते तुझे गाणे"

लताजींची खासियत म्हणजे संगीतकार प्रथितयश असो कि होतकरू, दोघांसाठी त्या तितक्याच आत्मीयतेने गात. याचे उदाहरण म्हणजे संगीतकार सोनिक ओमी. या काका पुतण्याच्या जोडीचा एक चित्रपट होता, 'दिल ने फिर याद किया'. यात एक सिच्युएशन होती नायिका जीवाच्या आकांताने नायकाचा पुकारा करत आहे. त्यासाठी गाणे लिहिण्यात आले.. 'आजा रे प्यार पुकारे'. या गाण्याच्या रेकोर्डिंग च्या वेळेस स्टुडियो मध्ये निर्माता दिग्दर्शक रावल पण होते. दिदींनी हे गाणे इतक्या दर्दभऱ्या आवाजात गायले की रावल साहेब म्हणाले," असे गाणे ऐकून नायक तत्पर न धावून आला तरच नवल!"

लता व मुकेश म्हटले की आठवते त्यांचे सर्वात प्रसिद्ध गाणे 'सावन का महिना पवन करे सोर'. सोर व शोर या नौंक झोंक मुळे हे गाणे स्टेज शो चे खास आकर्षण असते. मुकेशजींची आठवण दीदींना येते ती प्रामुख्याने त्यांच्या स्वतःवरच विनोद करण्याच्या दुर्मिळ सवयी मुळे. गाण्याच्या रेकोर्डिंगच्या वेळेस   एखादा वादक थोडा जरी बेसूर वाजवू लागला तर ‘माझी नक्कल इथं कोण बरं करतंय?’ असा मिस्कील प्रश्न मुकेश करायचे आणी मग लता दीदी यांना हसू आवरायचे नाही

बॉम्बे टॉकिजच्या 'जिद्दी' चित्रपटाच्या गाण्याच्या रेकॉर्डिंगसाठी लतादीदी एकदा लोकलमधून प्रवास करीत होत्या. त्यावेळी त्याच डब्यात एक तरुण चढला. स्टेशनवर उतरल्यावर दीदींनी टांगा केला आणी स्टुडिओकडे जाण्यासाठी निघाल्या. त्या तरुणाने देखील टांगा केला आणी त्याचा टांगा देखील दीदींच्या टांग्यापाठोपाठ यायला लागला. लतादीदी जेव्हा स्टुडिओत पोहचल्या तेंव्हा तो तरुण देखील तिकडेच येत असल्याचे दीदींनी पाहिले आणी त्या घाबरल्या. पाठलाग करीत असलेल्या त्या अनोळख्या व्यक्तीशी त्यांची कुरबूरही झाली. त्यानंतर दीदींना कळले की ती पाठलाग करणारी व्यक्ती म्हणजे गायक किशोर कुमार आहेत व ते देखील जिद्दी चित्रपटामध्ये गाणार आहेत.

तुम्हाला ' मंझील' चित्रपटामधील सीन आठवतो का? ज्यात मौसमी खूप घाबरलेली असते कारण अमिताभ तिचा सतत पाठलाग करत असतो. पण जेव्हा सरतेशेवटी मौसमीला सत्य कळते कि तो आपला पाठलाग करत नसून आपण ज्या समारंभाला जात आहे तिथे तो हि आमंत्रित आहे. एवढेच नाही तर अमिताभ जेव्हा गाऊ लागतो तेव्हा मौसमी नकळतच त्याची चाहती होते. अगदी नेमके तसेच लता दीदी बाबत घडले होते  

आपल्या जडण घडणीमध्ये सर्वांचाच कसा मोलाचा हातभार होता हे विशद करताना लता दीदी म्हणतात, "अनिल विश्वास यांनी मला माईकसमोर गाताना श्वासाचं तंत्र (कधी घेणे, कधी सोडणे) कसं वापरावे ते शिकवलं" लता दीदी सज्जाद यांची आठवण काढताना म्हणतात," आलाप देखील जास्त मोठ्याने गाऊ नये या मताचे संगीतकार सज्जाद हुसेन होते". 'दिल में समा गये सजन' हे सज्जाद यांचे लतादीदींनी गायलेले गाणे, आज हि रसिकांची पहिली पसंती आहे

सज्जाद यांनी दिलेली गाणी गायला किंचित कठीण असायची असे दीदी म्हणतात. त्यांना अशी गाणी का दिली गेली या मागे पण एक रोचक कहाणी आहे. सज्जाद, गद्दार चित्रपटाच्या गाण्यांच्या तालिमी एका बिल्डींगच्या चौथ्या मजल्यावर घेत होते. खाली तिसऱ्या मजल्यावर लता दीदींचे गुरु, अमानत खान देवासवाले राहायचे. सज्जाद व त्यांची गहिरी दोस्ती होती. एकदा अमानत खान सज्जाद यांना म्हणाले, "माझ्याकडे एक उत्तम शिष्या आहे; तिला तू गाण्याचा चान्स दे. मी तिला कितीही कठीण मुरकी, सरगम किंवा तान दिली तरी ती सहज आत्मसात करते. मला रोज प्रश्न पडतो व मी मग अल्लालाच साकडे घालतो; अल्ला, तूच सांग मी हिला रोजरोज नवीन काय शिकवू?"

जी एस कोहली, ओ पी नय्यर यांचे संगीत सहाय्यक होते. ओ पी यांनी आपल्या संगीतासाठी लता दीदी यांचा आवाज घेण्यापेक्षा नेहमी आशाचा आवाज वापरला. पण जेव्हा जी एस कोहली यांनी स्वतंत्रपणे संगीत द्यायला सुरुवात केली तेव्हा मात्र त्यांना दीदींना घेण्याचा मोह आवरता आला नाही. 'शिकारी' चित्रपटाचे संगीत देताना, 'अगर में पुछू जवाब दोगे', 'तुमको पिया दिल दिया' ही गाणी वाट्याला आली ते लताच्या; आशाच्या नव्हे!

लता बरोबर काम करायला मिळणे म्हणजे फार मोठी पर्वणी असे त्या काळच्या सर्व संगीतकारांना वाटायचे. रवींद्र जैन यांनी 'सौदागर' साठी महत्प्रयासाने लता दीदी यांच्या तारखा मिळविल्या होत्या. पण दुर्दैवाने रेकोर्डिंग च्या दिवशीच रवींद्र जैन यांचे वडील वारले. रवींद्र जैन त्यांनी त्या हि परिस्थितीमध्ये आधी रेकोर्डिंग व नंतर अंत्यसंस्कार असा अवघड निर्णय घेतला. त्या दिवशी लता दीदी कोणत्या गाणे गायल्या माहित्येय?'तेरा मेरा साथ रहे'

खुद्द लता मंगेशकर यांनी एखाद्याला आपल्यासोबत गाणे गायला द्या अशी शिफारस केल्यावर, त्याच्या काय भावना असतील हे जाणून घायचे असेल तर मनहर उधास यांना विचारा. अभिमान चित्रपटामध्ये अमिताभ साठी रफी व किशोर गाणार होते. सोबत एका गाण्यासाठी मुकेश देखील. पण रेकॉर्डिंग च्या वेळी मुकेश विदेशात असल्यामुळे लता दीदी यांनीच मनहरचे नाव सुचविले. रसिकांच्या वाटेला मग आले एक सदाबहार गाणे, 'लुटे कोई मन का नगर'

नौशाद यांनी लता दीदी यांची स्तुती करताना म्हटले आहे, "राहो में तेरे नगमे, महफिल मे सदा तेरी, करती है सभी दुनिया तारीफ लता तेरी I दिवाने तेरे फन के इन्सान, इन्सान तो फिर इन्सान है, हद यह है की सुनता है आवाज खुदा तेरी II"

लता दीदी व त्यांचे संगीत क्षेत्रातील योगदान ही कापूसकोंड्या सारखी न संपणारी गोष्ट आहे. तेव्हा आज इथेच थांबतो पण आपल्या सर्वांच्या लाडक्या दीदींना वाढदिवसाच्या शुभेछा देऊनच!

       II ज्ञानभाषा मराठी II
II माझी शाळा📚माझी भाषा II

No comments:

Post a Comment