Saturday 9 January 2016

गझलची तोंड ओळख - भाग ८

📝 गझलची तोंड ओळख - भाग 8 📝
✒संकलन : डॉ. अमेय गोखले. ✒

💥आजचे गझल वृत्त :
        मालिबाला

🎶 एकूण मात्रा : 19

♻लगावली (लघु , गुरू क्रम)

गा ल गा गा गा ल गा गा गा ल गा
2  1  2   2  2  1  2  2  2  1  2
= 19

(गा - गुरू , ल -लघु)
💐💐💐💐💐💐💐💐💐

💥 आता उदाहरणे पाहू :


आज हे आभाळ आहे दाटले
खूप बोलावे तुझ्याशी वाटले

वृक्ष हे घायाळ पक्ष्यांसारखे
प्राक्तनाने पंख ज्यांचे छाटले

कापरे निःश्वास तैसे दैव हे
खोल या डोहात काजळ साठले

मूक हे प्रत्येक येथे पाखरू
आतले गाणे जसे की आटले

सोडिले आहे फुलांनी गाव हे
एकही नाही कुठेही भेटले
     (मंगेश पाडगावकर)


निर्दयांनो , हात कोणा लावता ?
कायद्याचा धाक कोणा दावता ?

माज हा तुम्हा कशाचा जाहला ?
आमुच्या शिक्क्यात तुम्ही मावता

'पाच वर्षे' काढुनी झोपा पुन्हा
आमच्या मागे कशाला धावता ?

आमुची सत्ता तुम्हाला पाहिजे
ती तशी मिळता अम्हाला चावता !

अर्धपोटी राहते जनता इथे
अन् कसे मस्तीत तुम्ही जेवता ?

जो तुम्हा नियमीत देई 'पाकिटे'
त्या बड्या धेंडास तुम्ही पावता

सर्वसामान्यास होती साह्य ज्या
मागण्या ऐकून तुम्ही कावता !

जनहितासाठी कुणी देता लढा
नेमके लफड्यात त्याला गोवता.....
    (कवी डॉ. अमेय गोखले)


एक खोली फक्त खाली पाहिजे
इंद्रियांची सोय झाली पाहिजे

नागव्यांची कोण वस्त्रे फेडतो
प्राक्तनाची माय व्याली पाहिजे

देवळांनी गुंड सारे पोसले
देवही आता मवाली पाहिजे

मोडुनी खाऊन झाला देश हा
प्रेतयात्राही निघाली पाहिजे

ऊर बडवाया पुढारी सज्ज हे
झुंडही भरपूर आली पाहिजे

मी स्वतःला पाहतो आहे विकू
मात्र साजेशी दलाली पाहिजे
       (मंगेश पाडगावकर)


लागले डोळे तुझे माझ्याकडे
अन् इथे मी मोजतो माझे तडे

शोधिती मागे पिशा वाटा मला
ही तुझी जाणीव पायांना नडे

तू उन्हाची कोवळी भोळी कळी
का तुला अंधार माझा सापडे ?

हे तुला रेशीम प्राणांचे दिले
बांध माझ्या वेदशांचे केवडे

मी कधीचा संपलो आहे तरी
आज का चिंता तुला माझी पडे ?
            (सुरेश भट)


आशयाला कूस द्यावी वाटले
शब्द सारे जन्मताना फाटले

ज्ञानही भ्रांतीत अंती पोचले
हुंदके काळे गळ्याशी दाटले

शेपटीने बांधलेल्या तंगड्या
सर्व मी माझे उमाळे छाटले

कोंबडीवर कोंबडा घेतो उडी
पंख केवळ याचसाठी ताठले

आतुनी गेलो दुभंगुन मी पुरा
क्षीण होते ते झरेही आटले
     (मंगेश पाडगावकर)


संकटांना तोंड देणे वेगळे
अन् भयाने दूर जाणे वेगळे...

पाहुनी अन्याय तू द्यावा लढा
भेकडांनी मार खाणे वेगळे...

काळजाचा ठाव घेती शब्द जे
वीरतेचे गीत गाणे वेगळे...

देशकार्याच्या रणी बेभान व्हा
'झिंगुनी बेशुद्ध' होणे वेगळे…

जन्म लावा मानवाचा सार्थकी
गांडुळाचा जन्म येणे वेगळे…
  (कवी डॉ. अमेय गोखले)


🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
✒ संकलन : डॉ. अमेय गोखले. ✒
💐💐💐💐💐💐💐💐💐

No comments:

Post a Comment