Saturday 16 January 2016

गझलची तोंड ओळख - भाग १३

🚩मराठी भाषा पंधरवडा🚩
📝 गझलची तोंड ओळख - भाग 13 📝
✒संकलन : डॉ. अमेय गोखले. ✒

💥आजचे गझल वृत्त :
        हिरण्यकेशी

🎶 एकूण मात्रा : 32

♻लगावली (लघु , गुरू क्रम)

ल गा ल गा गा ल गा ल गा गा ल गा ल गा गा ल गा ल गा गा
 1 2  1  2  2  1  2 1  2  2  1  2  1  2  2  1  2  1  2  2
= 32

(गा - गुरू , ल -लघु)
💐💐💐💐💐💐💐💐💐

💥 आता उदाहरणे पाहू :


सुन्यासुन्या मैफिलीत माझ्या , तुझेच मी गीत गात आहे
अजूनही वाटते मला की , अजूनही चांदरात आहे...

उगीच स्वप्नात सावल्यांची , कशास केलीस आर्जवे तू ?
दिलेस का प्रेम तू कुणाला ? तुझ्याच जे अंतरात आहे...

कळे न मी पाहते कुणाला , कळे न हा चेहरा कुणाचा ?
कसा मला भास होत आहे , तुझे हसू आरशात आहे...

उगाच देऊ नकोस हाका , कुणी इथे थांबणार नाही
गडे , पुन्हा दूरचा प्रवासी , कुठेतरी दूर जात आहे...

सख्या तुला भेटतील माझे , तुझ्या घरी सूर ओळखीचे
उभा तुझ्या अंगणी स्वरांचा , अबोल हा पारिजात आहे...
                             (सुरेश भट)


प्रकाशपूजक , परी दिव्याला कुठून मी घासलेट आणू ?
कुणी न ऐके इथे कुणाचे , घसा कशाला फुकाच ताणू ?

भयाण दर्या , खवीस वारा , नसे तयाला मुळीच पर्वा
क्षयी कुडी ही तशीच होडी , नसे दिवा वा नसे सुकाणू...

इथून लाथा , तिथून लाथा , बसून ढुंगण मुळात फाटे
दिसे परंतू कुठे न कर्ता , शिव्या तरी मी कुणास हाणू ?

किती बुवा नागवून गेले , जुन्याच पोथ्या , जुनी वाळवी
भविष्य बैसे दबा धरोनी , जसा विषारी कुणी जिवाणू...

घरंगळे ही खटारगाडी , उतार सारा , असंख्य खड्डे
मलाच मी हा असा तिर्‍हाइत , कुणास सांगू ? कुणास जाणू ?
                   (मंगेश पाडगावकर)


सख्या तुला भेटण्यास मी या , भल्या पहाटे निघून आले
घरातुनी चोरपावलांनी , लपून आले... जपून आले...

तुझ्याच स्वप्नात रात गेली , तुझ्याच स्वप्नात जाग आली
तुझ्याच स्वप्नात जाणार्‍या , जगातुनी मी उठून आले...

विचारले मी न अंबराला , विचारले मी न वारियाला
तुझ्या मिठीचा निरोप आला , मिठीत मी मोहरून आले...

अताच हा दूर तारकांचा , कुठेतरी काफिला निघाला
अताच हे चांदणे गुलाबी , हळूच मी पांघरून आले...

गडे मला बोलता न आले , कुणीकुणी बोललेच नाही
अखेर माझ्याच आसवांना , तुझा पता मी पुसून आले...
                          (सुरेश भट)


पुन्हा पुन्हा का मनात माझ्या , विचार येती तुझेच आता
शब्द माझिया कवितांमधले , गुलाम होती तुझेच आता.....

पहा इथे या फुलाफुलांना , तुझ्या स्मृतींचा सुगंध येतो
पहा पाखरे माझ्यासाठी , गाणे गाती तुझेच आता.....

कुरळ्या कुरळ्या तुझ्या बटांशी , झुळझुळणारे अवखळ वारे
इथे येऊनी माझ्यापाशी , क्षेम सांगती तुझेच आता.....

साखरझोपेमध्ये पहाटे , लोक पाहती स्वप्न सुखाचे
त्या स्वप्नातुन माझे डोळे , दर्शन घेती तुझेच आता.....

नसेन कोणी महाकवी मी , मेघदूत हे तरी धाडले
तेही पुन्हा येऊन येथे , निरोप देती तुझेच आता.....
                 (कवी डॉ. अमेय गोखले)


जिवंत माझ्या कलेवराला , अजून आयुष्य हाक मारी
कशास एका भिकारड्याला , पुकारतो हा दुजा भिकारी...

भिकेत आणून आस तेव्हा , प्रतारणांचा प्रपंच केला
अता दुवा देत देत माझी , जिथे तिथे हिंडते शिसारी...

कशी करू सांत्वने कुणाची ? अजून अश्रू कितीक झेलू ?
पिढ्यापिढ्यांच्या मनोगतांचा , कसा बनू एकटा फुलारी ?

मिळेल त्या तोतया क्षणाशी , जमेल तो डाव मांडला मी
अजूनही स्वप्नद्यूत चाले , अजून हा मी असा जुगारी...

दुभंगलेल्या उरात माझ्या , पहा किती सूर्य झेप घेती
चुकून हे रक्त पेटण्याची , अधेमधे दाखवी तयारी...

असंख्य माझ्या पराभवांचे , चिणून मी टाकिले इरादे
मधेच ही बंडखोर गीते , उफाळुनी फुंकिती तुतारी...

उगीच एका दिवंगताने , करू नये एवढी अपेक्षा
असा कसा हा वसंत येई , पुन्हा पुन्हा माझियाच दारी...
                      (सुरेश भट)

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
✒ संकलन : डॉ. अमेय गोखले. ✒
💐💐💐💐💐💐💐💐💐

No comments:

Post a Comment