Saturday, 16 January 2016

गझलची तोंड ओळख - भाग १४

📝 गझलची तोंड ओळख - भाग 14 📝
✒संकलन : डॉ. अमेय गोखले. ✒

💥आजचे गझल वृत्त :
      सति जलौघवेगा

🎶 एकूण मात्रा : 24

♻लगावली (लघु , गुरू क्रम)

ल गा ल गा गा ल गा ल गा गा ल गा ल गा गा
 1 2  1  2  2  1  2  1  2  2  1 2  1  2  2
= 24

(गा - गुरू , ल -लघु)
💐💐💐💐💐💐💐💐💐

💥 आता उदाहरणे पाहू :


पुन्हा स्मशानी घडायचे ते घडून गेले
चितेवरी लोक जे नको ते रडून गेले

दिले कशाला नभास झोके तुझ्या स्वरांनी
कधीच गाणे तुझे मला शिंपडून गेले

अरे नसे हा सवाल माझ्याच आसवांचा
युगायुगांचे रुमाल सारे सडून गेले

करू तरी काय सांग माझ्या कलंदरीचे ?
कसा फिरू ? आसवांत रस्ते बुडून गेले

कुणाकुणाची किती किती खंत बाळगू मी ?
अताच आयुष्यही शिवी हासडून गेले

सुगंध तो कालचा तुला मी कुठून देऊ ?
अखेरचे थेंब अत्तराचे उडून गेले
                 (सुरेश भट)


जुना जरीही पराभवाशी करार आहे
मनात माझ्या बगावतीचा विचार आहे

पहा म्हणाले पवित्र आहे नदी तिथे ती
पुढे जाऊनी खरे पहाता गटार आहे

तनामनाची पुन्हा कुणाला विकून लज्जा
गुलाम बनुनी जगावयाला नकार आहे

बुरेपणाचा उगाच सल्ला कुणास देऊ ?
भलेपणाही इथे तयांचा उधार आहे

लढा म्हणाला इथे अम्हाला पुढे करोनी
तुरूंगवासी अम्ही , अता तो फरार आहे
          (कवी डॉ. अमेय गोखले)


जुने पुढारी तपासतो आजकाल आम्ही
नवे नवे ओळखून घेतो दलाल आम्ही

बघून घ्या आज आमुची ही भणंग वस्ती
सुधारतो आज लोकशाही बकाल आम्ही

म्हणाल त्याला मते अम्ही नेहमीच देऊ
युगायुगांचे गुलाम आम्ही , हमाल आम्ही

जुन्या गुन्ह्यांची समर्थने एवढी कशाला ?
विचारला का तुम्हा 'नको तो' सवाल आम्ही ?

अलीकडे उद्धरून जातात सर्व पापी
तयांस पापे करू तयांची बहाल आम्ही

मिळेल तेव्हा मिळेल तो सूर्य चोरलेला
निदान ही पेटतीच ठेवू मशाल आम्ही

उद्यावरी सोपवू नये फैसला उद्याचा
अखेरचा चोख लावू निकाल आम्ही
                   (सुरेश भट)


तुझ्या नभाला गडे किनारे अजून काही
तिथेच जाऊन वेच तारे अजून काही

जरी सुखाच्या निवांत दारास मी नकोसा
खुली व्यथांची सताड दारे अजून काही

तसा न रसात्यात आज धोका मला परंतू
घरात येतात वाटमारे अजून काही

गडे मला सांग तूच माझी-तुझी वदंता
विचारते गाव हे बिचारे अजून काही

करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची
रणात आहेत झुंजणारे अजून काही

विझून माझी चिता लोटली युगे तरीही
विझायचे राहिले निखारे अजून काही
                (सुरेश भट)


तुझ्याचसाठी निळे चांदणे भुलून येते
तुझ्याचसाठी वेल फुलांनी फुलून येते

एक इशारा नजरेचा हा तुझ्या पुरेसा
वार्‍याच्या ओठांवर गाणे जुळून येते

तू जेव्हा प्रतिबिंब आपले तळ्यात बघसी
टपोर कमळांनी हे पाणी खुलून येते

प्राजक्ताचे झाड तसे आकाश निळे हे
झुकते खाली , तुझ्या घरावर झुलून येते

तुझी खुषी हा मोहरण्याचा उत्सव असतो
जगणे अपुला अर्थ नव्याने कळून येते
             (मंगेश पाडगावकर)


दिलास तू शाप जीवनाच्या उनाडकीचा
विचारला मीच प्रश्न तेव्हा तुला चुकीचा

अताच सारे कसे इथे शांत शांत होते
अताच मी ऐकला पुन्हा बार बंदुकीचा

कशास मी रक्त दाखवू आपुले कुणाला ?
अजूनही घाव हा तसा त्या न लायकीचा

अता इथे राहतात आवाज हुंदक्यांचे
खरेच हा गाव माणसांच्या भुताटकीचा

जरी तुझ्या पाकळ्यांत मी गुंतलो तरीही
गडे , तुझा हा सुगंध माझ्या न मालकीचा

अता जगू चांदण्यातल्या चाहुलींप्रमाणे
करार माझा-तुझा असा ह्या चुकामुकीचा
                 (सुरेश भट)

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
✒ संकलन : डॉ. अमेय गोखले. ✒
💐💐💐💐💐💐💐💐💐

No comments:

Post a Comment