Saturday 2 January 2016

गझलची तोंड ओळख - २

गझलची तोंड ओळख - २
मराठी भाषा पंधरवडा
गझलची तोंड ओळख
__________________

✒संकलन : डॉ. अमेय गोखले.

***आजचे गझल वृत्त***
वियदगंगा (मात्रा वृत्त)

***एकूण मात्रा : 28***

♻लगावली (लघु , गुरू क्रम)

ल गा गा गा ल गा गा गा ल गा गा गा ल गा गा गा
1  2   2  2  1  2  2  2  1  2  2  2  1  2  2  2
= 28

(गा - गुरू , ल -लघु)
************************************************

=>आता उदाहरणे पाहू :


तिने बेचैन होताना , कळ्यांनी श्वास टाकावे
तिने होकार देताना , जिवाचे चांदणे व्हावे

किती मोजू तर्‍हा आता , तिच्या त्या वार करण्याच्या
तिच्या हाती कट्यारीने , सुखाचे खेळणे व्हावे

कधी ते डाव मांडावे , कधी हासून मोडावे
तिच्या रुसव्यात शब्दांचे , दुहेरी बोलणे व्हावे

तिच्या डोळ्यांतले पक्षी , फुलांचे सोबती होते
कितीदा रंग स्वप्नांचे , निजेवर सांडणे व्हावे
                 (मंगेश पाडगावकर)


स्मरायासारखा आता , तसा मी राहिलो नाही
कहाणी संपली माझी , जरी मी बोललो नाही

अता मागून ह्या शंका , अता मागून ही चर्चा
कसा मी वागलो होतो , कसा मी वागलो नाही

अता मी ऐकतो , तेव्हा जरा झंकारलो होतो
तसा झंकारतानाही , कधी झंकारलो नाही

अता खोटे जगायाला , निमित्ते शोधतो खोटी
असा आभास मी माझा , जसा मी जन्मालो नाही

कशाला आठवू आता , अवेळी मागची नाती
कधी या आसवांनाही , हवासा वाटलो नाही
                     (सुरेश भट)


फुलांची पापणी ओली , कुणासाठी कुणासाठी ?
पहाटे जाग ही आली , कुणासाठी कुणासाठी ?

अशा या चांदण्या रात्री , जुईच्या मांडवाखाली
उदासी दाटुनी आली , कुणासाठी कुणासाठी ?

नदीकाठी कुणी नाही , भरे काळोख हा सारा
झुरे दूरातला तारा , कुणासाठी कुणासाठी ?

सुखाची हाक येताना , धुके दाटून का येते ?
असे ओढून हे नेते , कुणासाठी कुणासाठी ?
                   (मंगेश पाडगावकर)


मला माझी पुरे झोळी , कुणाचे काय मी घ्यावे ?
नसे मी दास कोणाचा , कशासाठी कुणा भ्यावे ?

खिशातिल लाख नोटांचा , नसे उपयोग मोक्षाला
स्वतःचे पुण्य जाताना , स्वतःच्या सोबती न्यावे

हरिश्चंद्राप्रमाणे व्हा , शिका दातृत्व कर्णाचे
इथे सर्वस्व इतरांच्या , भल्यासाठी तुम्ही द्यावे

विखारी दान नियतीचे , इथे चुकले न कोणाला
वृथा सोडून जिद्दीला , विषाचे घोट का प्यावे ?

हिशोबी पाप-पुण्याच्या , मिळाले भोग जे भाळी
पुरे भोगूनिया त्यांना , पुन्हा जन्मून ना यावे
                (कवी डॉ. अमेय गोखले)


कुणी मज पाहिले नाही , नजर चुकवून जाताना
कुणी मज ऐकले नाही , तुझे मी गीत गाताना

किती त्या चांदण्या रात्री , किती भेटी , उसासे ते
मलाही समजले नाही , मला समजून घेताना

तुझ्या डोळ्यांत बघताना , मला विसरून गेले मी
कुणी मज छेडिले नाही , तशी बेहोश होताना

क्षणांची लाजर्‍या सार्‍या , तुझ्या पाशी फुले झाली
कुणीही जाणले नाही , असे उमलून येताना
                  (मंगेश पाडगावकर)


सुखाच्या सावल्या सार्‍या , कशा वेडावुनी जाती
जसा मी फोडतो टाहो , तशा त्या तोडती नाती

कधी वाटे , पुढे जावे , सुखाला दुःख सांगावे
सुखाची पाहुनी दुःखे , इथे माझी फुटे छाती

कशी सार्‍या जिव्हाळ्यांची , जिव्हारी लागते माया
कशी सार्‍याच शब्दांची , उरे माझ्या मुखी माती

जराशा ओळखीचाही , कुणीही राहिला नाही
रिकामे दान मी माझे , पुन्हा घेतो रित्या हाती

कसा कापूर जन्माचा , उडाला आरतीआधी
कशा ह्या सांजवेळेला , दिव्यांच्या कोरड्या वाती
                      (सुरेश भट)


कटाक्षांची तिची दुनिया , तिचे ते श्वास मायावी
विषाची का कळेना या , जिवाला प्यास लागावी ?

तिच्या ओठांतली जादू , स्मिताचे चांदणे ओले
तिच्या गाण्यावरी का ही , जिण्याची तार वाजावी ?

फुलांचा मंत्र घालुन ती , करी बंदी भुलाव्याने
तरी त्या इंद्रजालाची , पुन्हा का ओढ वाटावी ?

कधी ती बोलली होती , असेलहि भास तो झाला
पहाटेला तरी स्वप्नी , तिची चाहूल का यावी ?
                   (मंगेश पाडगावकर)

*********************************
✒ संकलन : डॉ. अमेय गोखले.
*********************************

No comments:

Post a Comment