Wednesday 6 January 2016

विरामचिन्हांत राम नाही?

भिंग भाषेचे : विरामचिन्हांत राम नाही?

Posted in लेख डॉ. नीलिमा गुंडी

सभ्य भाषा. असभ्य भाषा. खळाळती भाषा.
लवणारी भाषा. ‘हरकती’ घेत प्रवाही
राहणारी भाषा... भाषा हा विषयच रोचक
आणि चिंतनाला उद्युक्त करणारा. मराठी
भाषेचा विविध अंगांनी वेध घेत,त्यात होणारे
बदल टिपत, त्यावर आपले मत नोंदवत
विचारप्रवृत्त करणारं हे सदर. अभ्यासू
लेखिका आणि कवयित्री नीलिमा गुंडी
यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेलं...

मध्यंतरी कोलंबिया विद्यापीठातील भाषावैज्ञानिक प्रा. जॉन मॅकव्होर्टर यांनी विरामचिन्हांच्या वापराबद्दल पुनर्विचार करावा असा अभिप्राय दिल्याची बातमी वाचली. ही बातमी समस्त भाषाप्रेमी मंडळींसाठी धक्कादायकच ठरली. या प्राध्यापकमहाशयांनी स्वल्पविराम, अर्धविराम काढून टाकावेत, असे सांगताना दिलेले कारण असे होते की इंटरनेटचा वापर करणारे, तसेच बहुतांश लेखक विरामचिन्हांचा वापर करण्यात टाळाटाळ करतात!
त्यांचा हा अभिप्राय उद्वेगातून तर आलेला नाही ना अशीही शंका येते. विरामचिन्हांमध्ये खरंच राम नाही? त्यांच्यात खरंच अर्थ नाही? समजा तसे असेल तर लोक एखादी अर्थपूर्ण व्यवस्था नीट वापरत नाहीत म्हणून ती व्यवस्थाच गैरलागू ठरवायची का? - असे प्रश्‍न निर्माण होतात.
आपली मराठी भाषा मध्ययुगात मुख्यत: मौखिक स्वरूपात प्रचलित होती. त्यामुळे तिच्यासाठी विरामचिन्हांची गरज नव्हती. पुढच्या काळात छापील स्वरूपात लेखन सुरू झाले. त्यामुळे समोरच्या श्रोत्याची जागा स्थलकालापलीकडच्या वाचकाने घेतली. त्यासुमारास इंग्रज राजवटीत इंग्लिश भाषेच्या संपर्कातून आपण त्या भाषेतील विरामचिन्हव्यवस्था स्वीकारली. वाचकापर्यंत अर्थ नीटपणे पोहोचवण्यासाठीची ती गरज होती. त्यासाठी व्याकरणग्रंथात उदाहरणादाखल दिलेले वाक्य असे आहे.
मी आजपासून चोरी करणार नाही केली तर मला मारावे.
या वाक्यात स्वल्पविराम ‘नाही’ या शब्दानंतर न देता जर ‘करणार’ या शब्दानंतर दिला; तर अर्थाचा अनर्थ होईल! लहानसा स्वल्पविराम अर्थप्रक्रियेत किती महत्त्वाची भूमिका बजावत असतो, याचे हे ठळक उदाहरण आहे. विरामचिन्हे वगळली तर ‘ब्रेथलेस’ गाण्यांसारखी आपल्या नाटकातील पात्रांची संभाषणेही ‘ब्रेथलेस’ होतील! शिक्षण, विज्ञान, कायदा आदी क्षेत्रांत (जिथे भाषेतील शास्त्रीयता अचूक असावी लागते.) तर अनागोंदीच माजेल!
भाषेतील अर्थ शाश्‍वत काळ व्यवस्थितपणे कळावा म्हणून विरामचिन्हे स्वीकारलेली असतात. प्रश्‍नचिन्ह, उद्गारवाचक चिन्ह, लोपचिन्ह या विरामचिन्हांशी अर्थाचे सूक्ष्म तरंग निगडित असतात, तर स्वल्पविराम, अर्थविराम, पूर्णविराम अशी काही विरामचिन्हे म्हणजे जणू अर्थाचा प्रवाह नीट वाहण्यासाठी बांधलेले पाट असतात. एक उदाहरण पाहू:
१. ‘‘मी नाही येणार. जा तू. नको थांबूस.’’
२. ‘‘मी नाही येणार जा! तू नको थांबूस.’’
वरील दोन वाक्यांमध्ये तेच शब्द त्याच क्रमाने आहेत. मात्र दुसर्‍या वाक्यातील उद्गारवाचक चिन्हामुळे अर्थामध्ये किती ङ्गरक पडला आहे. बोलणार्‍या व्यक्तीच्या मनातला रागाचा ङ्गणकारा उद्गारवाचक चिन्हामुळेच लक्षात येत आहे. अशी अनेक उदाहरणे देता येतील.
साहित्यिक मंडळी तर विरामचिन्हांचा उपयोग कलात्मक अंगाने विशेष कसोशीने करतात. विंदा करंदीकर यांच्या ‘आकाशाचे वजन भयंकर’ या कवितेतील पुढील ओळी पाहा :
‘‘आकाशाचे वजन भयंकर
अन् आत्म्याची मान कोवळी;
म्हणूनच करतो
क्षमा तुला मी, माझ्या आत्म्या
क्षमा तुला हे
भेदरणार्‍या,
हे भ्यालेल्या,भगवंता अन्,
हे मृत्युंजय, हे डरपोका,
हे अमृतार्णव हे थरकापन्’’,
(‘धृपद’, पॉप्युलर, मुंबई, २००४, पृ.२४)
आता यात किती स्वल्पविराम आहेत! या स्वल्पविरामांमुळे कवीने आत्म्यासाठी वापरलेल्या संबोधनांचा अर्थ लक्षात यायला मदत होते. नाहीतर ती नुसती शब्दांची यादी ठरेल! ‘हे मृत्युंजय, हे डरपोका’, ‘हे अमृतार्णव, हे थरकापन्’ या ओळींमधील दोन संबोधनांमधील विरोध जाणवण्यासाठी वाचकाला क्षणाची तरी उसंत मिळायला हवीच ना! दोन शब्दांच्या मधल्या रिकाम्या जागेतदेखील आशय दडलेला असतो. तो वाचकांच्या लक्षात येण्यासाठी विरामचिन्हांचे थांबे हवेतच!
आजकाल तंत्रज्ञानाच्या वाढत्या प्रसारामुळे भाषांची उपेक्षा होत आहे. भाषेच्या नियमांविषयीची बेपर्वा वृत्ती दिसत आहे. ही परिस्थिती सर्वांसाठी हितावह नक्कीच नाही. शेवटी आपण इतकंच म्हणू या की विरामचिन्हांकडे आपण सार्‍यांनीच थोडे अधिक लक्ष द्यायला हवे. त्यांचा वापर जागरूकपणे करायला हवा. उद्या भाषेतून ती जर खरोखरच अंतर्धान पावली तर... नकोच तो विचार!
----
डॉ. नीलिमा गुंडी

संकलन :

    ||ज्ञानभाषा मराठी||
||माझी शाळा-माझी भाषा||

No comments:

Post a Comment