Friday 1 January 2016

गझलची तोंड ओळख - १

मराठी भाषा पंधरवडा
गझलची तोंड ओळख
✒संकलन : डॉ. अमेय गोखले.
आजचे गझल वृत्त :
मंजूघोषा (मात्रा वृत्त)
 एकूण मात्रा : 21
♻लगावली (लघु , गुरू क्रम)
गा ल गा गा गा ल गा गा गा ल गा गा
2  1  2   2  2  1  2  2  2  1  2  2
= 21
(गा - गुरू , ल -लघु)

 आता उदाहरणे पाहू :

मी फुले ही वेचताना सांज झाली
दूर रानातून त्याची हाक आली
थांबली भांबावुनी ही सर्व झाडे
सावल्यांच्या भारलेल्या हालचाली
कापर्‍या तंद्रीत कोणी स्वप्नपक्षी
हालल्या भासापरी रानी मशाली
टाकुनी सारी फुले ही धावले मी
चांदण्यांचा थेंब माझ्या एक गाली

मी निघालो दार तूही लाव आता
सोबतीला फक्त उरले घाव आता
चेहरे सार्‍या घरांनी झाकलेले
जाहले परके मला हे गाव आता
ओळखीची वाटही दूरस्थ झाली
मी न उच्चारीन माझे नाव आता
मी निघालो घेउनी पेला रिकामा
सांग मी घेऊ कशाचा ठाव आता
चाललो चोरापरी हा एकटा मी
जिंकले ते सर्व ठरले साव आता
पान गाण्याचे असे हे फाटलेले
अक्षरांना भार झाले भाव आता

ते म्हणाले चेहरे चुकवीत होतो
मी खरे तर आसवे लपवीत होतो
हासले ते पाहुनी मी वाकलेला
मुखवटे त्यांचेच मी जमवीत होतो
भासल्या या भ्याड त्यांना हालचाली
मी कळ्या कोमेजल्या फुलवीत होतो
बोलले ते भाकतो करुणा नभाची
पाखरे मी भाबडी उडवीत होतो
सांगती ते वागणे आले गळ्याशी
मी गळ्यातुन सूर हे रुजवीत होतो

हे खरे की खूप माझे हाल झाले
ना तरी गाणे कधी बेताल झाले
हे खरे की हा खिसा होता रिकामा
हृदय हे नाही परी कंगाल झाले
हे खरे की शब्द हे दुबळेच होते
फाटणार्‍या माणसाला ढाल झाले
हे खरे की बोलणे ते क्षीण होते
पण शिवीहुन एकदा इरसाल झाले
हे खरे की कापले अस्तित्व सारे
पण अभाग्याला उबेची शाल झाले

ओठ हे फुटले तरी गाणार आहे
पालखी उचलून मी नेणार आहे
जागजागी बंदुका या रोखलेल्या
पाखरू उडुनी तरी जाणार आहे
कालची ही दैवते विक्रीस आली
मी तरीही हाक ही देणार आहे
मानतो अद्यापही मी माणसाला
हा दिवा हातात मी घेणार आहे
कापला काळोख आहे गल्बताने
शीड तेजाने उद्या न्हाणार आहे

किर्र वेळी पाखरू कोठून आले
का असे हे कापते? कोणास भ्याले?
ऊब का घरट्यातली झाली नकोशी?
थंड , काळा , कापरा काळोख प्याले
स्वागताला वाकली फांदी फुलांनी
टाकुनी सारे परंतु का निघाले ?
काय होते आत हे सांगे न काही
ओठ गाणारे कशाने बंद झाले ?
शब्द मी माझे दिले होते तरीही
पांघरोनी ही उदासी का उडाले ?

शाहण्याने आपुले थडगे खणावे
आणि खणताना पुन्हा गाणे म्हणावे
जे मुळी नाहीच त्याची ही प्रतीक्षा
व्यर्थ डोळ्यांनी असे येथे शिणावे
सोबतीला राहती जखमाच अंती
लाभता सांगात का कोणी कण्हावे
गुंतलेले आतडे होते निरुत्तर
डोंगरातुन घोष प्रश्नांचा दुणावे
सोशिला काळोख ज्याने तोच जाणे
आपुल्याला आपुला तारा खुणावे

शुभ्र चाफ्याच्या फुलांच्या या पहाटे
अंतरी माझ्या अनोखा गंध दाटे
रातराणीची उरे चाहूल मागे
लाजर्‍या शपथेवरी हळुवार वाटे
चांदण्याला परतण्याची कोण घाई
केशराचे रान पाण्यातुन पेटे
पावलांना पाकळ्यांची जाग आली
पापण्यांना कोवळे आभाळ भेटे
काळजाचे काठ हे न्हाले दुधाने
अन् फुलाहुन फूल झाले आज काटे
✒ संकलन : डॉ. अमेय गोखले.
 टीप : आजच्या सर्व गझल रचना
कै. कविवर्य मंगेश पाडगावकरांच्या आहेत
#दिवसपहिला
#मराठीपंधरवडा

1 comment:

  1. ही गझल आहे व तिचा प्रकार काय आहे ते आज कळले माहितीबद्दल धन्यवाद !

    ReplyDelete