Wednesday 6 January 2016

मनाची श्रीमंती

🚩मराठी भाषा पंधरवडा🚩

✒कथा लेखन विशेष✒

👉🏾 शीर्षक : मनाची श्रीमंती
👉🏾 लेखक : प्रशांत दांडेकर

अमेरिकेतील एक छोट्याश्या खेड्यातील एका लहानग्याची हि गोष्ट आहे.  या लहानग्याचे नाव होते, पीटर व वय होते अवघे ८ वर्षे. एका बेकरीमध्ये तो ग्राहकांना पाव , पेस्ट्री इत्यादी विकायचा. बेकरीचा  मालक त्याला या कामासाठी रोज दोन  डॉलर द्यायचा. एक दिवस त्याच्या बेकरीसमोर अलिशान लीमुझीन येउन उभी राहिली. एवढी मोठी गाडी पहायची सवय नसलेल्या पीटरला याचे नवल वाटणे स्वाभाविकच होते. अलिशान गाडीच्या मालकाला काय हवे ते पाहायला तो जातीने काउंटर सोडून गाडी पाशी आला. त्या ग्राहकाची केक ची ऑर्डर स्वीकारताना ते बालसुलभ मन, डोळेभरून गाडीची झलक मनात साठवून ठेवत होते. त्या गरीब पीटरची टर उडविण्यासाठी तो गाडीचा मालक जरा कुत्सिकपणेच व गुर्मी दाखवत म्हणाला, " पोरा, आपल्याकडे हि अशी कार असावी असे तुला वाटत असेल ना ! मला हि तसेच वाटायचे म्हणूनच मला माझ्या मोठ्या भावाने हि कार माझ्या एकविसाव्या वाढदिवसाला भेट दिली" त्याचे हे बोलणे ऐकून पीटर जरा विचारात पडला त्याचे हे ध्यान पाहून गाडीचा मालक म्हणाला, " तुला हि वाटत असेल ना कि आपल्याला ही असाच एक भाऊ असावा" त्यावर आपले मौन तोडून पीटर म्हणाला, " मला असा भाऊ असावा असे वाटण्यापेक्षा; मला असा कोणाचा तरी भाऊ व्हायला जास्त आवडेल" या एकाच वाक्याने त्या तथाकथित श्रीमंत माणसाची पैशाची सर्व झिंग उतरली. भौतिक श्रीमंतीपेक्षा मनाची श्रीमंती किती मोठी असते ते त्याला कफल्लक पीटर ने शिकविले होते. आपली चूक सुधारत त्या गाडीच्या मालकाने पीटर ला जवळ घेत त्याला २० डॉलर ची टीप दिली. वर त्याला म्हणाला, "यातला १ डॉलर तुझी टीप तर उरलेले १९ डॉलर मला मनाची श्रीमंती काय हे दाखवून देण्यासाठी"

आपला हा लहानगा पीटर शाळेत हि जायचा. शाळेत अभ्यासामध्ये जरी तो थोडा पाठी असायचा तरी मैदानी खेळांमध्ये मात्र नेहमीच पुढे असायचा मग तो बास्केट बॉल असो कि धावण्याची शर्यत. एकदा त्याच्या शाळेमध्ये स्पोर्ट्स डे होता. स्वारी खूप खुशीत होती. ८०० मीटर धावण्याच्या शर्यतीमध्ये आज परत एकदा मेडल मिळवणारच असा निश्चय करूनच त्याने शर्यतीची झकास सुरुवात केली होती. पण आज त्याला कट्टर प्रतिस्पर्धी मिळाला होता मायकेलच्या रुपामध्ये. इतर स्पर्धकांना कधीच मागे टाकत पीटर व मायकेल फिनिश लाईन पाशी वेगाने पळत होते. पीटर मायकेल पेक्षा फक्त चार पावले पुढे होता व फिनिश लाईन पासून फक्त १० मीटर दूर. पीटर ला पाठी टाकण्याचा शेवटचा निकराचा प्रयत्न करत असताना मायकेल पायात गोळे आल्याने मैदानामध्ये कोसळला     पीटर ने ते पहिले; स्वारी फिनिश लाईन सोडून परत मागे फिरली मायकेल ला सावरण्यासाठी. खाली कोसळलेल्या मायकेलला पीटर ने आपल्या हाताने उठविले व मग मायकेलचा एक हात आपल्या गळ्यात टाकत व आपल्या खांद्याचा आधार देत दोघे फिनिश लाईन पाशी चालू लागले. दोघांनी एकत्रच फिनिश लाईन पार केली. गहिवरलेल्या मायकेलने पीटरला मिठी मारली, डोळ्यांमधून गंगा जमुना वाहू लागल्या. पीटरच्या मनाची श्रीमंती आज सगळ्या शाळेने अनुभवली होती. ‘स्पर्धा महत्वाची पण प्रतिस्पर्ध्याप्रती आदर हा जास्त महत्वाचा; एखादी गोष्ट जिंकण्याबरोबरच , मने जिंकणे अधिक महत्वाचे’ ... पीटरचे हे, मायकेल सोबत  ट्रॉफी स्विकारतानाचे वाक्य त्यादिवशी पूर्ण शाळेत चर्चेचा विषय ठरला

स्पर्धा जिंकल्यामुळे सेलिब्रेशन तर व्हायलाच हवे. त्या लीमुझायीन च्या मालकाने दिलेले २० डॉलर, त्यातील ७ शिल्लक राहिले होते. पीटरची स्वारी आधी बर्गर किंग मध्ये शिरली. ५ डॉलर मध्ये किंग साईज बर्गर खाऊन उरलेले २ डॉलर आईस क्रीम साठी उडवायचे असे साधे सरळ गणित त्याने मनापाशी मांडले. पीटर आपले आवडते चोकोफिल आईस्क्रीम घेण्यासाठी पार्लर मध्ये शिरला. खरे तर त्याला सर्वात मोठा कप घ्यायचा होता. म्हणून त्याने त्या कपची किमत विचारली ती होती ५ डॉलर. साहजिकच त्याची गाडी मिडीअम कपावर घसरली त्याची किंमत होती २ डॉलर. त्या कपाला हि नकार देत स्वारी सर्वात छोट्या साईज वर आली. पीटर च्या या वागण्यामुळे पार्लर मधील सेल्समन वैतागला. पीटर वर खेकसतच तो म्हणाला पैसे नाहीत तर आईस स्क्रीमचे स्वप्न पहायचेच कशाला? त्यावर पीटर म्हणाला मी टेबल ४ वर बसतो माझ्यासाठी छोटा कप जो १ डॉलरचा आहे तोच घेऊन या. सेल्समन जरा वैतागुनच पीटरला आईस क्रीम देऊन आला. पीटर ने आपल्या आवडत्या आईस क्रीम चा स्वाद घेतला व पार्लर मधून निघाला. पण जाता जाता त्या आईस क्रीम देणाऱ्या माणसाला त्याने टेबलवरचे पैसे घेण्याची विनंती केली. केवळ आपल्याला ला १ डॉलर टीप देता यावी म्हणून पीटरने स्वतःचे मन मारून छोटा कप घेतला हे पाहून त्या सेल्समनला आपलीच लाज वाटली. आपण काय समजत होतो व हा मुलगा काय निघाला हे पाहून त्याला मनाची श्रीमंती खिश्याची मोहताज नाही याची जाणीव झाली व नकळतच त्याचा हात पीटरला स्यालुट करायला उठला

आपला पीटर, मनाचा असाच मोठेपणा दाखवत एक दिवस कधी मोठा झाला ते कळलेच नाही. अभ्यासात यथा तथाच असल्याने इंजीनिअर किंवा डॉक्टर न होता त्याने स्वतःचे एक फास्ट फूड सेंटर काढले. आमच्याकडे टेबलावरच्या मेन्यु शिवाय भिंतीवरचा मेन्यु हि आहे हि त्याची जाहिरात अनेकांचे लक्ष वेधून घेत होती. पण बहुतेक ग्राहक त्याबद्दल जास्त न विचारता आपले खाणे पिणे आवरून निघून जायचे   पण एके दिवशी पीटर सारखाच विचार करणारा एक ग्राहक आला. त्याने २ बर्गर ऑर्डर केले. एक टेबलवरचा तर दुसरा भिंतीवरचा. आज पीटरचा चेहरा खऱ्या अर्थाने उजळला होता. पीटर जातीने त्या ग्राहकाजवळ आला. त्याच्याकडून दोन बर्गरचे पैसे घेताना त्याने एक बर्गर व एक छान भेटकार्ड त्याला भेट केले व एक बर्गरचे चित्र असलेला स्टीकर समोरच्या भिंतीवर चिकटविला.

आता बाकीच्या ग्राहकांना भिंतीवरचा मेन्यु काय ते कळले होते. मग बघता बघता भिंतीवर चहा, आईस क्रीम, बर्गर, पेस्ट्री विराजमान होऊ लागल्या. आता त्या भिंतीला आस होती ते हा मेन्यु वापरणाऱ्या ग्राहकाची. तो दिवस हि उजाडलाच.. एक बेघर, लाचार वृद्ध त्या फूड सेंटर पाशी आला. जरा बिचकतच तो आत शिरला व जरा ओशाळवाण्या नजरेने त्याने भिंतीवरील बर्गर कडे बोट दाखवत ऑर्डर दिली. पीटरला आज आपण सेंटर उघडल्याचा खऱ्या अर्थाने अभिमान वाटला. त्याने जातीने त्या अनोख्या ग्राहकाला स्वतः सर्व्ह केले. तो वृद्ध तृप्त मनाने परत फिरला व पीटरने भिंतीवरील तो स्टीकर आपल्या पर्सनल डायरी मध्ये डकवला. लीमुझीन भेट देणाऱ्या भावाप्रमाणे आज पीटर वागला होता

आपल्या सर्वांना देखील आयुष्यात पीटर व्हायला मनोमन आवडत असते पण त्यासाठी लागणारी इच्छा शक्ती नसते. ती इच्छा शक्ती आपल्या मुलांच्या मनात निर्माण करण्याची जबाबदारी काही अंशी त्यांच्या पालकांची पण असते. मला अजूनही आठवत आहे माझ्या आईची ती बासुंदी; जिने माझ्या जिभेवरच नाही तर माझ्या मनात हि गोडी भिनवली. एकदा मी आईकडे मस्त पैकी बासुंदी करण्याचा हट्ट केला. आईने देखील जरा ही आढे वेढे न घेता जायफळयुक्त, ड्राय फ्रुट्स घातलेली बासुंदी बनविली. मी त्यावर चांगलाच आडवा हात मारला. थोडी बासुंदी तरीही राहिली होती. आईने ती वाटीमध्ये काढून फ्रीज मध्ये ठेवलेली देखील मी पहिली होती.

भांडी घासायला येणाऱ्या मावशी जेव्हा बासुंदी चे खरकटे भांडे पाहतील तेव्हा त्यांच्या मनात देखील आपल्या लेकरासाठी असे गोड धोड मिळाले तर? अशी भावना नक्कीच येणार. मातृसुलभ भावनेला सलाम करण्यासाठीच माझ्या आई ने ती वाटी काढून ठेवली होती नाही का?

       ||ज्ञानभाषा मराठी||
||माझी शाळा📚माझी भाषा||

No comments:

Post a Comment