Tuesday 5 January 2016

गझलची तोंड ओळख - भाग ५

 गझलची तोंड ओळख - भाग 5 
✒संकलन : डॉ. अमेय गोखले. ✒
आजचे गझल वृत्त :
            राधा
 एकूण मात्रा : 23
♻लगावली (लघु , गुरू क्रम)
गा ल गा गा गा ल गा गा गा ल गा गा गा
2  1  2   2  2  1  2  2  2  1  2  2  2
= 23
(गा - गुरू , ल -लघु)

 आता उदाहरणे पाहू :

बिंब सूर्याचे ढगांनी झाकले येथे
देवळांचे कळससुद्धा वाकले येथे
नेसणे गुंडाळले डोईस थोरांनी
नागव्यांचे राज्य आता ठाकले येथे
जागजागी दहशतींचे ठाम हे अड्डे
राजरस्तेही ठगांनी रोखले येथे
दुर्जनांची फौज ही एकत्र झालेली
वंश सार्‍या सज्जनांचे फाकले येथे
जिंकिली ही झुंड सारी या लुटारूंनी
हात ख्रिस्ताचे खिळ्यांनी ठोकले येथे
         (मंगेश पाडगावकर)

संस्कृतीचे बंध सारे तोडतो पैसा
वासनेशी फक्त नाते जोडतो पैसा
विकृतीच्या विक्रयाचा वाढला धंदा
नागव्याने लाज सारी सोडतो पैसा
राबती कोणी बिचारे , मालकासाठी
नेमक्या त्यांच्याच माना मोडतो पैसा
ते पहा कैदी पळाले , झोपली 'खाकी'
की तुरुंगांच्या कड्याही फोडतो पैसा ?
राहती नामानिराळे ते पुढारी अन्
कार्यकर्त्यांनाच अंती झोडतो पैसा
       (कवी डॉ. अमेय गोखले)

जाणिले आधीच होते जीव जडताना
श्वास हा ढळलाच नाही , नाव बुडताना
शोधिले नाही कधी अस्वस्थ नजरेने
हात का दिसतात कोणा , देठ खुडताना ?
झेलले सारे इशारे मी वसंताचे
स्तब्ध होतो सर्व पाने येथ झडताना
हात घरट्याने किती उंचावले तरिही
पाखरू नसते कुणाचे दूर उडताना
दैव होते व्याध हे ठाऊक का नव्हते ?
शांत होतो काळजाला बाण भिडताना
मी कधी नाकारिले नव्हते तुटायाचे
पाहिले का सांग कोणी फूल रडताना
         (मंगेश पाडगावकर)

केवढी काव्यातही जादू करी दाढी
"वाढवा आता" म्हणे वागीश्वरी , दाढी
त्या तिथे झाली कुमारी कोंबडी माता
या इथे ही चापते अंडाकरी , दाढी
ह्या कवींना... कोडग्यांना काय सांगावे ?
लाजण्याला लाजते ही लाजरी दाढी
शोधली जेव्हा तिच्या केसात मी 'क्रांती'
केवढी संतापली माझ्यावरी दाढी
हालती माझ्यापुढे या शेकडो दाढ्या
ही खरी , का ती खरी , का ती खरी दाढी ?
ऐनवेळी बोलली संतापुनी राधा
"बोचते मेल्या तुझी ही श्रीहरी , दाढी"
केवढा कोंदाटला हा धूर ब्रह्मांडी
काय कोणाची जळे कोठेतरी दाढी ?
झोपला जेव्हा कवी , उद्गारली शेळी
"लिज्जतीसाठी मिळाली ही बरी दाढी"
                (सुरेश भट)

पाच वर्षांनी पुन्हा , सरसावुनी भाले
घोषणावाले निघाले , घोषणावाले…
मांडण्या बाजार येथे , 'व्होट बँकेचा'
लोकशाहीचे पहा , सौदेकरी आले…
जिंकण्यासाठी नव्याने , ताठ मानेने
हे पुढे झाले , जुने पचवून घोटाळे...
धर्म तुमचा कोणता , अन् जातही सांगा
या मतांचा त्यावरी , सौदा इथे चाले…
लावुनी शेंडी अशा , निर्बुद्ध जनतेला
जिंकले की हे पुन्हा , निद्रिस्तही झाले…
       (कवी डॉ. अमेय गोखले)

एकट्याने एकटे गर्दीत चालावे
एकट्याने आपुल्याशी फक्त बोलावे
थांबते गर्दी फुलांच्या उंबर्‍यापाशी
एकट्याने आतुनी निर्माल्य हुंगावे
दारही अपुले तिर्‍हाईत होतसे जेव्हा
एकट्याने ओळखावे अन् पुढे जावे
एकट्याच्या आरश्याचा आंधळा पारा
एकट्याने चेहर्‍याला बिंब मानावे
लागते जावेच या अंधारयात्रेला
एकट्याने एकटा अपुला दिवा व्हावे
        (मंगेश पाडगावकर)

✒ संकलन : डॉ. अमेय गोखले. ✒


No comments:

Post a Comment