Sunday 3 January 2016

गझलची तोंड ओळख - भाग ३

🚩मराठी भाषा पंधरवडा🚩
📝गझलची तोंड ओळख - भाग 3📝
✒संकलन : डॉ. अमेय गोखले.

💥आजचे गझल वृत्त :
व्योमगंगा (मात्रा वृत्त)

🎶 एकूण मात्रा : 28

♻लगावली (लघु , गुरू क्रम)

गा ल गा गा गा ल गा गा गा ल गा गा गा ल गा गा
2  1  2   2  2  1  2  2  2  1  2  2  2  1  2  2
= 28

(गा - गुरू , ल -लघु)
💐💐💐💐💐💐💐💐💐

💥 आता उदाहरणे पाहू :


वाट होती आंधळी अन् , भोवती अंधार होता
हात तू हाती दिला गं , एक हा आधार होता

सोशले तू सर्व काही , वाट माझी चालताना
साहिले पायांत काटे , हा तुझा शृंगार होता

वैर केले या जगाने , घाव सारे घेतले तू
पापण्यांनी झेलला गं , तूच हा संसार होता

बोललो नाही तरीही , जाणतो मी आत सारे
चांदणे झालीस , माझे दैव हा अंगार होता

गीत गाता अंतरीचे , गीत मी गातो तुझे गं
तू दिलेल्या रागिणीला , कोवळा गंधार होता
               (मंगेश पाडगावकर)


मोजला गेलो कितीदा , मापला गेलो कितीदा
रोज बाजारात ह्या मी , तोलला गेलो कितीदा

हा भिकार्‍यांचाच दंगा , रक्त मोठ्यांचे न सांडे
शब्दरक्तातून मीही , सांडला गेलो कितीदा

वाटते आता मला की , फार आधी जन्मलो मी
हाच मी केला गुन्हा अन् , डागला गेलो कितीदा

झोकला मी प्राण तेव्हा , मीच जेव्हा प्रेम केले
व्यर्थ दारोदार का मी , टाळला गेलो कितीदा

नेहमीसाठीच आहे , मी प्रकाशाचा पुजारी
फक्त अंधारामधे मी , गाडला गेलो कितीदा
                   (सुरेश भट)


गीत हे गाशील तेव्हा , मी जगी असणार नाही
प्रीत ही स्मरशील तेव्हा , मी तुला दिसणार नाही

कोवळ्या किरणांत जेव्हा , केस तू सोडून येशिल
लाडके लाजून माझे , फूल हे हसणार नाही

चांदणे बिलगेल अंगा , कोवळे रेशीम होउन
त्या क्षणी पाऊल माझे , हे पुन्हा फसणार नाही

कालचे ना आज पाणी , अर्थ हे उरणार नाहित
पाहुनी चंद्राकडे मी , आसवे पुसणार नाही
            (मंगेश पाडगावकर)


या तमाच्या पार तेथे , पेटलेला सूर्य आहे
ही नव्हे उल्का , तयाने छेडलेला सूर आहे

भेदुनी सत्ता तमाची , अंतरे कापून मोठी
पोहोचण्या भूमीवरी , त्याची प्रभा आतूर आहे

भेट ना घेता तयाची , पाहते त्याला दुरूनी
चांदणी त्याची प्रिया , लाजेमधे जी चूर आहे

सांजवेळेला पुन्हा हा , दिनमणी अस्तास जाता
मर्त्य लोकांच्या मनाशी , भावनांचा पूर आहे

उजळुनी जाती दिशा , कितिही असूदे रात्र मोठी
या नभाचा न्याय सार्‍या , सृष्टिला मंजूर आहे

हा नसे नुसताच तरा , या जगाचा हा नियंता
स्पर्शुनी चोहीकडे , हा देव तरिही दूर आहे

भास्कराचा वंश माझा , तेज त्याचे या जिभेला
भीड ना ठेवी कुणाची , शब्द माझा शूर आहे
           (कवी डॉ. अमेय गोखले)


आज मी जे गीत गातो , ते उद्या गातील सारे
चालु दे वक्षात माझ्या , वादळांचे येरझारे

उंच आकाशात माझी , गुंजने होतील तेव्हा
सारखे होतील माझे , पर्वतांमाजी पुकारे

कोटि कंठातून माझी , वैखरी घेईल ताना
शब्द हा एकेक माझा , वेचुनी घेतील तारे

लाघवी काही फुलांची , लोचने होतील ओली
दूरच्या येतील हाका , "तू पुन्हा येशील का रे?"

रंगल्या पूर्वेस माझी , वेदना देईल लाली
अन् तुझ्या दारात , माझी धूळ हे नेतील वारे
                (सुरेश भट)


रात्र आहे वादळी , वारा पिसा सैराट आहे
रोशनीच्या दुष्मनांनी , रोखलेली वाट आहे

कोसळाया आज आली , आसर्‍याची सर्व झाडे
दोस्त हो जागे रहा , ही वैरियांची रात आहे

स्पर्श हे करतील त्याची , कोंडणारी भिंत होते
कोळसे होती मनाचे , ही इथे वहिवाट आहे

कोवळ्या माना फुलांच्या , मोडणारे हात येथे
पाय टाका रोवुनी , काळोख आता दाट आहे

ही इमानाची दलाली , हे यशाचे कोंडवाडे
पापणी जागी असू द्या , हा यमाचा घाट आहे
                 (मंगेश पाडगावकर)



💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
✒ संकलन : डॉ. अमेय गोखले.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

No comments:

Post a Comment