Thursday, 7 January 2016

गझलची तोंड ओळख - भाग ७

🚩मराठी भाषा पंधरवडा🚩
📝 गझलची तोंड ओळख - भाग 7 📝
✒संकलन : डॉ. अमेय गोखले. ✒

💥आजचे गझल वृत्त :
          मंदाकिनी

🎶 एकूण मात्रा : 28

♻लगावली (लघु , गुरू क्रम)

गा गा ल गा गा गा ल गा गा गा ल गा गा गा ल गा
2  2  1  2   2  2  1  2  2  2  1  2  2  2  1  2
= 28

(गा - गुरू , ल -लघु)
💐💐💐💐💐💐💐💐💐

💥 आता उदाहरणे पाहू :


सार्‍याच डोळ्यांची उभी , डोळ्यात माझ्या आसवे
जे सोशिले , जे सोसतो , तेही न आता जाणवे

बेवारशी मी सोडिला , माझा करंटा हुंदका
त्यांच्या दयेला मी रडू नाही दिले माझ्या सवे

आयुष्य गेले शेवटी , आरोप खोटे लावुनी
माझ्या खुलाशांचे परी , थोतांडही नाही नवे

होता कुणाचा क्रूस जो मी वाहिला खांद्यावरी
जे ठोकले गेले खिळे , त्यांनीच केली आर्जवे
                    (सुरेश भट)


माझ्या मनाचे बोलणे , सांगू कसे कोणास मी ?
साधासुधा मी भाबडा , ऐकाल का माझे तुम्ही ?

माझी व्यथा विकणे जगी , नाही मला जमले कधी
म्हणुनी स्वतःशी बोलतो , हलके कराया दुःख मी

ना सांगता येते मला , जे शल्य आहे मन्मनी
जरिही मुक्याने ऐकतो , सार्‍या जगाचे शब्द मी

या गूढ मौनामागची , भाषा कुणा समजेल का ?
उकलेल का कोडे कुणा , का एवढा अस्वस्थ मी ?
               (कवी डॉ. अमेय गोखले)


गाणी तुझा ओठातली , आता विराया लागली
स्वप्ने तुझ्यास्तव पाहिली , मागे फिराया लागली

गावात जेव्हा पोचलो , काळोख होता दाटला
माझ्या दिव्यावर काजळी , का ही धराया लागली ?

झाडांत वारा थांबला , की हुंदका दबला जसा
प्राणात माझ्या का अशी भीती भराया लागली ?

आहे जिवंत खरेच मी , की भास हा होतो मला ?
काळ्या भ्रमाची ही सुरी , छाती चिराया लागली

निर्जीव काचेसारखे , आभाळ हे माथ्यावरी
शून्यात आता पावले , माझी शिराया लागली
                (मंगेश पाडगावकर)


या रोजच्या वाटेवरी , का एकट्याने भ्यायचे ?
एकेकटे आलो जगी , अन् एकट्याने जायचे

येथे यशाचे श्रेय तू , देतोस का कोणा कधी ?
पापातही वाटेकरी , तू एकट्याने व्हायचे

नाही सुखी कोणी पहा , सारे व्यथांनी त्रासले
म्हणुनीच अश्रु आपले , एकेकट्याने प्यायचे

नियतीपुढे सारे फिके , ना रंक तू ना राव तू
हे प्राक्तनाचे भोगणे , तू एकटे भोगायचे

सारेच स्वार्थी या जगी , विश्वास कोणाचा नसे
एकेकटे चालायचे , अन् एकट्याने गायचे
          (कवी डॉ. अमेय गोखले)


आता मजेने बोलतो , भेटेल त्या दुःखासवे
सांभाळुनी घेती मला , माझी इमानी आसवे

प्रत्येकवेळी मी मला , माझी खुशाली सांगतो
प्रत्येकवेळी आणतो , ओठांवरी हासू नवे

सैराट तेव्हा हिंडला , माझाच टाहो पोरका
आता इथे जे सोसतो , ते आसर्‍यासाठी हवे

माझा जगायाचा गुन्हा , माझ्याच संगे संपला
जो संपलो मी एकदा , त्याला न आता शोधवे

माझ्या चितेला चूड मी , लावून झालो मोकळा
आता कशाला मी करू , ज्या त्या बघ्यांची आर्जवे ?

आता अनुज्ञेवाचुनी , गातात ही गीते मला
माझा स्वतःचा सूरही , ओठी न आता पालवे

केव्हातरी दात्यापरी , आयुष्य हाका मारिते
मीही असा भिक्षेकरी , ज्याला न काही मागवे
                     (सुरेश भट)

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
✒ संकलन : डॉ. अमेय गोखले. ✒
💐💐💐💐💐💐💐💐💐

No comments:

Post a Comment