Sunday 10 January 2016

गझलची तोंड ओळख - भाग ९

🚩मराठी भाषा पंधरवडा🚩
📝 गझलची तोंड ओळख - भाग ९ 📝
✒संकलन : डॉ. अमेय गोखले. ✒

💥आजचे गझल वृत्त :
          सौदामिनी

🎶 एकूण मात्रा : 18

♻लगावली (लघु , गुरू क्रम)

ल गा गा ल गा गा ल गा गा ल गा
1  2  2  1  2  2  1  2  2  1  2
= 18

(गा - गुरू , ल -लघु)
💐💐💐💐💐💐💐💐💐

💥 आता उदाहरणे पाहू :


तुला लाजलेली अशी पाहतो
सुखाच्या सुगंधात मी नाहतो

जराशी लवे बावरी पापणी
फुलांचे उरी बाण मी साहतो

झुरे शब्द ओठात ओलावला
अनोखा सुगावा मला बाहतो

तुझ्या भोवती धुंद वारा फिरे
वसंतातली आर्जवे वाहतो

कशी नीज माझी फुलांनी भरे ?
फुलांच्याच स्वप्नात मी राहतो
      (मंगेश पाडगावकर)


उद्या व्हायचे ते अता होऊ दे
कुठे काय माझे अडे ? जाऊ दे…

कुणी निंदतो वा कुणी वंदतो
कुणाचे कुणी गोडवे गाऊ दे

मला काय त्याचे , जगो वा मरो
उपाशी मरो वा किती खाऊ दे

उपेक्षा सदाचीच आम्हा मिळे
कुणाचीहि सत्ता इथे येऊ दे

कुणी काय माझे भले पाहिले ?
खरे सूख माझे मला पाहू दे
  (कवी डॉ. अमेय गोखले)


मनी तुंबुनी भावना दाटली
कधीचीच चप्पल असे फाटली

नसे एकही येथ मोची कुठे
किती घासुनी वाट मी काटली

कसा बंध फोडून जाऊ बरे ?
पिचे बर्गडी , मोडते वाटली !

खिसा फाटल्या जीर्ण वस्तीत या
दुकाने नवी ही कुणी थाटली ?

दिले सर्व भाडे विनापावती
अशी थोर खोली इथे गाठली
      (मंगेश पाडगावकर)


मला गाव जेव्हा दिसू लागले
लुळे पाय माझे रुसू लागले

लपंडाव माझातुझा संपला
तुझे तेच माझे असू लागले

तुझ्या अंतरी कोणती वादळे ?
मला हेलकावे बसू लागले

तुझी पाहता पाकळीपाकळी
गडे , पाहणेही फसू लागले

अशी ही कशी तीच ती उत्तरे ?
मला प्रश्न माझे हसू लागले

कुठे संपल्या रोजच्या यातना ?
पुन्हा हे दिलासे डसू लागले

कसा मी रडू ? हे कसे लोकही ?
स्वतःचेच डोळे पुसू लागले
            (सुरेश भट)


किती माणसे ही , किती माणसे ?
कडू धूर काळा पिती माणसे

दुपारी असे ओस रस्ते कसे ?
भिती माणसे ही , भिती माणसे

झुले झुंड , पुंगी कुणी वाजवी
कशी मी म्हणू ही जिती माणसे ?

चढे घोष , गोंगाट यांची नशा
रिती माणसे ही , रिती माणसे

किड्यांचेच हे भोग , संभोग हा
विती माणसे ही , विती माणसे
      (मंगेश पाडगावकर)


कधी प्राण गेला असे वाटते !
कधी भास झाला असे वाटते !

कसा काय काळोख तो संपला ?
उजेडास भ्याला असे वाटते !

कुठे मूक मोर्चा पहा कालचा
मुक्यानेच मेला असे वाटते !

पुन्हा तोच कैदी पळाला कसा
छुपा डाव केला असे वाटते !

इथे आज क्रांती कशी जाहली ?
नवा रोग आला असे वाटते !
  (कवी डॉ. अमेय गोखले)

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
✒ संकलन : डॉ. अमेय गोखले. ✒
💐💐💐💐💐💐💐💐💐

No comments:

Post a Comment