Sunday 3 January 2016

बांगड्या

आज आमची कोळीण ताजे ताजे बांगडे घेऊन आली होती.  त्यामुळे बांगड्याचे कालवण व गरमागरम भाकरी असा बेत आपसूकच ठरला होता. पण घाई घाईने स्वयंपाकाचे काम उरकण्याच्या गडबडीमध्ये सौच्या बांगड्या वाढल्या होत्या. बांगडा व बांगडी हे दोन जवळपास सारखे भासणारे शब्द, इंग्लिश माध्यमात शिकणाऱ्या आमच्या चिरंजीवाच्या कानावर पडल्याने गोची झाली होती.    

अस्सल खवैय्यांना बांगड्या म्हटले की बांगड्याचीआठवण होणे साहजिक आहे; पण चिरंजीव खरोखरचगोंधळले

होते. त्यात बांगड्या फुटल्या असे न म्हणता वाढल्याअसे सौ म्हणाल्याने चिरंजीव पुरते गारद झाले होते.त्याला समजावताना सौ म्हणाली, ‘अरे नचिकेत या नुसत्या बांगड्या नाहीत हे आमचे सौभाग्यलेणे आहे, यांच्या मध्ये आमचे भावविश्व सामावले असते.’ सौ चेबोलणे माझ्या कानावर पडले व मला लिखाणाला एकविषय सापडल्याचा आनंद झाला

पण लेखाची मनात जुळवाजुळव करताना मला असे प्रकर्षाने जाणवले की बांगड्यांचे भाव विश्व हे इतकेगुंतागुंतीचे आहे की त्याचे चित्रण या एका लेखात करणेसर्वस्वी अशक्य आहे.

बांगड्या म्हटले की रसिकांच्या मनामध्ये खूप सारी रोमेंटिक गाणी फेर धरू लागतात. 'चुडी नहीं मेरा दिलहै, देखो देखो तुटे ना', किंवा 'बिंदिया चमकेगी चुडीखनकेगी ' अशा गाण्यांमधूनच प्रियकर व प्रेयसीच्यापहिल्या वहिल्या प्रेमाची साक्षीदार असणारी ती;म्हणजे चुडी अर्थातच बांगडी आपल्याला भेटते.

प्रेयसीचा हात सदैव आपल्या हाती असावा, लवकरातलवकर तीने आपल्या नावाचा हिरवा चुडा भरावा, अशीगुलाबी स्वप्ने, उतावीळ प्रियकर, दिवसरात्र बघत असतोपण तशी संधी त्याला जंग जंग पछाडून देखील मिळतनसते. पण जेव्हा आपली हीच प्रेयसी,तिच्या मैत्रिणीच्यालग्नामध्ये, तिचा हात स्वखुशीने बांगड्या भरण्यासाठीकासाराच्या हातामध्ये देते तेव्हा क्षणभर या प्रियकरालात्या कासाराची असूया वाटते. अशा असूयेचीसाक्षीदार असतात त्या फक्त बांगड्या. खूप चित्रपटांमध्ये म्हणूनच प्रेयसीला चोरून भेटण्यासाठी प्रियकर चुडीवाला बनून जातो असा प्रसंग हमखास आढळतो.

लग्नामध्ये हिरवा चुडा हातामध्ये भरल्यावर प्रेयसीच्या चेहऱ्यावर जी लालिमा पसरते त्याला कशाचीच उपमा देता येणार नाही. बांगड्या या ऐश्वर्याच्या उतरंडीवर सर्वात खालच्या पायरी वर असतात मग चढ्याक्रमाने आपल्या समोर येतात त्या पाटल्या, तोडे, पिछोडी अशा अनेक नावांनी ओळखल्या जाणाऱ्या बांगडीच्या भगिनी. लग्नामध्ये याच भगिनींचा गवगवा असतो. किती तोळ्याच्या घालणार, किती घालणार, किती केरेटच्या यावरून मग महाभारत होण्याचे चान्सेस खूप असतात. हळव्या रेशीमगाठी जुळून येत असताना, भविष्यात निर्माण होणाऱ्या नात्यांमध्ये गाठी पाडण्यास याच बांगड्या व तिच्या भगिनी मंथरेची भूमिका अगदी चोख निभावतात

पण कधी कधी याच बांगड्या, पाटल्या वारसा पुढे नेण्याचे भावनिक काम देखील तितक्याच तन्मयतेने करतात. वरमाय जेव्हा मोठ्या विश्वासाने आपल्याला, (आपल्या सासूकडून) मिळालेल्या बांगड्या, पाटल्या तिच्या सुनेकडे सुपूर्द करते तेव्हा तिला एक मोठे काम तडीस नेल्याचे समाधान मिळते

बांगड्या फक्त कासारालाच रोजी रोटी देतात असे नाहीत तर अनेकांना रोजगार पुरवितात. असे म्हणतात सोनार आपल्या बायकोच्या बांगड्या घडविताना देखील सोने मारतात. सोन्यात पितळेची किती भेसळ केली आहे हे अंधारातील पाप फक्त ती बांगडीच जाणे.आणी यदाकदाचित बांगड्या बावनकशी असतील तर अडीअडचणीच्या वेळी त्या सावकाराच्या तिजोरीत जाऊन बसतात. स्वतःचा मालक येऊन मला सोडवून जाईल या आशेवर जगत असताना या बांगड्या, पाटल्याना गोरगरिबांची सावकाराकडून होणारी पिळवणूक याची देही याची डोळा पहावी लागते

खरे तर राजकारण्यांना देखील या बांगड्यांची आवड व भीती एकाचवेळी असते. विरोधात असताना नामर्द सत्ताधाऱ्यांचा माज उतरविण्यासाठी विरोधकांना मंत्र्याच्या हातात बांगड्या भरण्याची फार खुमखुमी असते तर हेच विरोधक जेव्हा सत्ताधारी बनतात तेव्हा आपल्याला कोणी बांगड्या तर आहेर देणार नाहीत या चिंतेत सदैव असतात

शब्देविना संवादू साधण्यात देखील बांगड्यांचा हात कोणी धरू शकणार नाही. मित्रांच्या किंवा घरातील थोरामोठ्यांच्या संगतीमध्ये रमलेल्या आपल्या अहोंना 'बायकोचा विसर तर पडला नाही ना?' असे सुचविण्यासाठी कित्येक गृहिणींनी बांगड्यांचा किणकिणाट आयुष्यात एकदा तरी केलाच असेल नाही का? किंवा आपल्याला न विचारता घेतल्या गेलेल्या निर्णयाला आपली नापसंती दर्शविण्यासाठी पण हाच मार्ग काही जणी संयुक्त कुटुंबामध्ये अजूनही वापरतात.

चुगली करण्यामध्ये बांगड्या माहीर असतात; याचा एक सुंदर किस्सा एका प्रतिथयश मराठी नटाने एका मुलाखतीमध्ये रंगवून सांगितला होता. ऐन उमेदीच्या काळात छोट्या घरात एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये राहताना या कलाकाराला व त्याच्या बायकोला स्वयंपाक घरात झोपावे लागत असे. रात्री प्रणयाराधन करताना बांगड्यांची किणकिण ऐकू येऊ नये म्हणून मग हा कलाकार बायकोच्या बांगड्या रुमालाने बांधून ठेवायचा

बांगड्यांचा रंग देखील खूप काही सांगून जातो. लाल व पांढऱ्या रंगाच्या बांगड्या बंगाली कन्येच्या हातामध्ये हटकून दिसतातच. काही राजस्थानी आदिवासी जमातींमध्ये पार कोपरापर्यंत लाखेच्या व काचेच्या तुकड्यांनी सजलेल्या लाल बांगड्या घालण्याचा रिवाज दिसून येतो; तर एखाद्या मेचींगच्या बाबतीत जागरूक असणाऱ्या दिवानीसाठी, तिच्या हातातील बांगड्यांचा रंग, कानातल्या व गळातल्या आभूषणचा रंग तिच्या साडी प्रमाणे सदैव बदलत राहतो.

पण बांगड्यांच्या नशिबी फक्त सुखच नाही तर अपार दुःख हि येते. सौभाग्याचे प्रतिक असल्याने वैधव्य आल्यावर याच बांगड्या बळजबरीने फोडल्या जातात. आपण आपला खंबीर अधिकार कायमचा हरवला या दुःखाची दाहकता स्त्रीला आतून जाळत असते व तिच्या या दुःखाचा हुंकारच जणू तुटणाऱ्या बांगड्या जगासमोर आणत असतात  

बलात्कारासारख्या घृणास्पद कृत्याच्या साक्षीदार होण्याचे भोग देखील याच बांगड्यांच्या नशिबी असतात. त्यामुळे 'वाटेवर काचा ग!' असे बोल त्यांच्या तोंडून वेळोवेळी निघत असतात

फाळणीचे चटके, पानिपत मधील नृसंहार वगैरेंचे वर्णन करताना किती लाख बांगड्या फुटल्या, प्रेते व फुटलेल्या बांगड्यांच्या काचांनी किती ट्रक सीमेपलीकडून आले याचे वर्णन वाचताना अंगावर शहारे आले नाही तरच नवल.

कधी कधी एखादा भीषण अपघात झालेला असतो. जखमींना वेळेवर उपचार देण्यापेक्षा काही समाजकंटक,मृतांच्या किंवा जखमींच्या हातातील सोन्याच्या बांगड्या खेचून घेऊन माणुसकीला काळे फासण्याचे कृत्य करतात. यावेळी बांगड्यांना आपण बहुमोल असल्याची लाज वाटते. कधी कधी तर जबरी दरोड्याच्यावेळी बांगड्या हातातून निघत नाहीत म्हणून हातच कापून नेण्याचे क्रौर्य दरोडेखोर दाखवितात व बांगड्यांचे काळीज रक्ताने माखून टाकतात

तर कधी कधी गैरसमजातून म्हणा किंवा एका मोठ्या कटाचा भाग म्हणून म्हणा, एकाद्या निरपराध माणसावर बांगड्या चोरीचा आळ घेतला जातो व मग तो निरपराध तुरुंगाची वारी करतो व कधीकधी गुन्हेगारी विश्वाचा भाग होण्यास भाग पाडला जातो. या अन्यायाची बोच बांगड्यांना देखील वाटत असणारच नाही का?

पण या बांगड्या कधी कधी यशोगाथेच्या भागीदार म्हणून देखील जगासमोर येतात. घरातील स्रीधन गहाण ठेवून नवीन धंद्यासाठी अनेकांनी भांडवल उभारले आहे व आपल्या धंद्याचे साम्राज्य उभे करण्यासठी पहिले दमदार पाऊल टाकले आहे. या गौरवशाली क्षणांचे भागीदार होण्याचे भाग्य अनेक बांगड्यांनी मिरविले आहे

बांगड्या या पवित्र प्रेमाच्या, त्यागाच्या पण साक्षीदार असू शकतात हे रसिकांना कळून आले ते 'वहिनीच्या बांगड्या' या चित्रपटामुळे. मातृसुखाला पारखा झालेला दीर आणी पुत्र सुखापासून वंचित राहिलेली वहिनी यांच्या निर्मळ प्रेमाची अत्यंत जिव्हाळ्याने चित्रित केलेली कौटुंबिक कलाकृती, प्रत्यक्ष व्यवहारात ही दिसून येते की

आमच्या लहानपणी केलिडोस्कोप मिळायचा. त्यात काचेच्या बांगड्यांचे अनेक तुकडे असायचे. त्या तुकड्यांनी नाना विविध मनमोहक रंगसंगतीचे आकार तयार व्हायचे ज्याचे आम्हा लहानग्यांना खूप कुतूहल वाटायचे. तसाही बांगड्यांचा आम्हाला अभ्यासामध्ये देखील खूप उपयोग व्हायचा. ग्रहणाच्या आकृती काढताना हटकून वेगवेगळ्या साईज च्या बांगड्या माझ्या कंपास बॉक्स मधून बाहेर यायच्या.

हातातील बांगडी काढून ती तीन बोटांनी गरगर फिरवून आपल्या रडणाऱ्या तान्हुल्याचे लक्ष दुसरीकडे उडविणारी माउली कित्येकांच्या डोळ्यांसमोर तरळली असेलच

बांगड्यांचे भाव विश्व असे सर्वव्यापी आहे. अगदी लहानग्यापासून ते थोर मोठ्यांपर्यंत.

बांगड्यांनी भावविश्वच नाही तर मराठी भाषा देखील समृद्ध केली. 'हातच्या कंकणाला आरसा कशाला' 'हातात बांगड्या नाही भरल्यात आम्ही' असे अनेक वाक्प्रचार, वाक्ये सामन्यांच्या तोंडात अगदी सहज येतात.

पण आजकाल बांगड्यांचे अप्रूप थोडे कमी होत आहे. नवीन मोडर्न जनरेशनला जीन्स व टीशर्ट वर बांगड्या सूट होत नाहीत असे मनापासून वाटते. बांगड्यांची जागा आता ब्रेसलेट ने घेतली आहे. पण ब्रेसलेट मध्ये बांगड्यांसारखा भावनिक ओलावा नाही हे नवीन पिढीला कधी कळणार?


- प्रशांत दांडेकर

No comments:

Post a Comment