Sunday 10 January 2016

गझलची तोंड ओळख - भाग १०

🚩मराठी भाषा पंधरवडा🚩
📝 गझलची तोंड ओळख - भाग 10 📝
✒संकलन : डॉ. अमेय गोखले. ✒

💥आजचे गझल वृत्त :
          आनंदकंद

🎶 एकूण मात्रा : 24

♻लगावली (लघु , गुरू क्रम)

गा गा ल गा ल गा गा गा गा ल गा ल गा गा
 2  2  1  2  1  2  2  2  2  1  2  1  2  2
= 24

(गा - गुरू , ल -लघु)
💐💐💐💐💐💐💐💐💐

💥 आता उदाहरणे पाहू :


केव्हतरी पहाटे , उलटून रात्र गेली
मिटले चुकून डोळे , हरवून रात्र गेली

कळले मला न केव्हा , सुटली मिठी जराशी
कळले मला न केव्हा , निसटून रात्र गेली

सांगू तरी कसे मी , वय कोवळे उन्हाचे ?
उसवून श्वास माझा , फसवून रात्र गेली

उरले उरात काही , आवाज चांदण्यांचे
आकाश तारकांचे , उचलून रात्र गेली

स्मरल्या मला न तेव्हा , माझ्याच गीतपंक्ती
मग ओळ शेवटाची , सुचवून रात्र गेली
                  (सुरेश भट)


गाण्यात सर्व माझ्या , माझे इमान आहे
ज्याचे खरे न गाणे , तो बेइमान आहे

येता समोर दुःखे , तो षड्ज झेलला मी
काट्यावरी स्वरांची , झुलती कमान आहे

झाडांत पावसाच्या , बेहोश आरतीला
वाजे मृदुंग तेथे , माझाच प्राण आहे

का वेदनेत होतो , हा जन्म साधनेचा ?
रेषाच संचिताची , ही बेगुमान आहे

आयुष्य पेटताना , ओठांत सूर होता
हे सोसणे सुराला , माझ्या प्रमाण आहे
            (मंगेश पाडगावकर)


अश्रु कधीच आता , मी ढाळणार नाही
संकेत या जगाचे , मी पाळणार नाही…

कोणी नसे कुणाचे , साराच हा दिखावा
इथल्या प्रलोभनांना , मी भाळणार नाही...

माझेच कष्ट सारे , अन् श्रेय हे कुणाला
हा घाम वंचनेचा , मी गाळणार नाही...

मीही जगेन आता , माझ्या मनाप्रमाणे
या कोवळ्या मनाला , मी जाळणार नाही...

शिकवू नये कुणीही , मी ओळखून आहे
माझी जबाबदारी , मी टाळणार नाही...
            (कवी डॉ. अमेय गोखले)


डोळ्यांत सांजवेळी , आणू नकोस पाणी
त्या दूरच्या दिव्यांना , सांगू नको कहाणी

कामात गुंतलेले , असतील हात दोन्ही
तेव्हा नको म्हणू तू , माझी उदास गाणी

वाटेवरी खुणेच्या , शोधू नको फुले ती
ना ठेविते फुलांची , माती इथे निशाणी

सौदा इथे सुखाचा , पटवून चोख घ्यावा
व्यवहार सांगती हा , ही माणसे शहाणी

कळणार हाय नाही , दुनिया तुला-मला ही
मी पापण्यांत माझ्या , ही झाकली विराणी
              (मंगेश पाडगावकर)


येतात मुख्यमंत्री , जातात मुख्यमंत्री
मिळतात सर्व अंती , मसणात मुख्यमंत्री

पाहू चला "मराठी अवतार" मोगलांचे
हल्ली म्हणजे 'टग्यांना' , म्हणतात मुख्यमंत्री

गर्दी नको , खिसेही आपापले तपासा
गेले म्हणे इथूनी , इतक्यात मुख्यमंत्री

जेव्हा "समान संधी" , यांना मिळेल तेव्हा
होतील सात एका , हप्त्यात मुख्यमंत्री

सांगू नये कुणीही , कोणास पथ्यपाणी
जे काय खायचे ते , खातात मुख्यमंत्री

जे आमदार त्यांना , समजू नका शिपाई
रांगेमधील तेही , 'अज्ञात' मुख्यमंत्री

कोणास काय ठावे ? 'वंशीच' त्या काळावे
होऊ नकोस बाबा , जन्मात मुख्यमंत्री
                  (सुरेश भट)


हे वेगळेच रस्ते , ही वेगळीच नाती
शहरात माणसांना , ही माणसेच खाती

इथल्या इमारतींना , आकाश ठेंगणे हे
सर्वत्र तक्षकांच्या , या माजल्या जमाती

रस्त्यावरी उपाशी , हे मूल माणसाचे
घाईत माणसे ही , बघती , निघून जाती

येथील भक्षकांना , गणवेश रक्षकांचे
अन् बेरकी लुटेरे , नेतेपणात न्हाती

गर्दीत राहुनीही , परकेपणा न संपे
येथे मुकेच सारे , बहिर्‍यांसमोर गाती
           (मंगेश पाडगावकर)


विश्वात माझिया या , हरवून चाललो मी
नाते दुज्या जगाशी , विसरून चाललो मी

गुंत्यात गुंतताना , ना भान राहिले अन्
माझ्या मनात गुंता , रुतवून चाललो मी

माझ्या मनात होते , आभास ज्या स्वराचे
अवघ्या जगामध्ये तो , शोधीत चाललो मी

अव्यक्त भावनांना , देऊन शब्दरूपे
समजूत या मनाची , काढीत चाललो मी

चित्तास जाहला जो , संताप या जगाचा
उन्मत्त या जगाला , तुडवीत चाललो मी
            (कवी डॉ. अमेय गोखले)

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏
✒ संकलन : डॉ. अमेय गोखले. ✒
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

No comments:

Post a Comment