Saturday 2 January 2016

पुराणातील वांगी

श्रावण महिना चालू झाल्याने स्नेहा आजीने विविध पोथींचे पारायण चालू केले होते. सोमवारचे शिवलीलामृत, शनिवारचे शनि महात्म्य असा तिचा  सर्व भरगच्च कार्यक्रम होता. पद्मजा हे सर्व बारकाईने न्याहाळत होती. तिला रामायण महाभारतापलीकडे काही माहितच नव्हते ना !

एक दिवस राहवून पद्मजा स्नेहा आजीला म्हणाली, " आजी, या पुस्तकांमध्ये पण मला शिकण्यासारखे काही तरी असेलच ना !". आजी म्हणाली, "पद्मजा , किती तरी वाक्प्रचार , म्हणी या पुराणातील पात्रांवरून आल्या आहेत. मग आज तुझी शिकवणी याच विषयावर घेतली तर?”  पद्मजाला हेच तर हवे होते.
आजी म्हणाली, "पद्मजा, तुला माहित असलेल्या रामायणापासून सुरुवात करूया. पहिला वाक्प्रचार घेवुया .. कुंभकर्णाचा अवतार .. माझा नातू म्हणजे सौमित्र, कुंभकर्णाचा अवतार आहे. ऊन्हे डोक्यावर आली तरी सुट्टीच्या दिवशी तो डाराडूर झोपलेला असतो. तुला कळले असेलच कि या वाक्प्रचाराचा अर्थ होतो; खूप  झोपा काढणारा माणूस

नाश्त्याच्या टेबलवरून हे सर्व ऐकणारी नुपूर म्हणाली, " ताई, मला हि आठवत आहे एक म्हण.. लंकेची पार्वती .. याचा अर्थ होणार अत्यंत साधी , गरीब स्त्री जिच्या अंगावर एक हि अलंकार नाही
रामबाण उपाय हा अजून एक वाक्प्रचार नुपूरनेच सुचविला. हमखास यश देणारा मार्ग असा अर्थ पद्मजाच्या डायरीमध्ये मग आपसूकच विसावला 

शिकवणी पुढे नेताना स्नेहा आजी म्हणाली, " रामायणामुळे मराठी  भाषेला खूप वाक्प्रचार मिळाले आहेत जसे कि लक्ष्मण रेषा ओलांडणे किंवा लक्ष्मण रेषा आखून घेणे किंवा अग्निपरीक्षा देणे. लक्ष्मण रेषा ओलांडणे म्हणजे दुसऱ्या व्यक्तीने  आखून दिलेल्या मर्यादा, ठरविलेले अधिकार यांच्या बाहेर जाणे किंवा लक्ष्मण रेषा आखून घेणे म्हणजे स्वतःच  आपले अधिकार क्षेत्र ठरविणे. तर अग्निपरीक्षा देणे म्हणजे स्वतःला निर्दोष किंवा खरे पटवून देण्यासाठी कठीणातील कठीण परीक्षा देणे.” त्यावर पद्मजा म्हणाली म्हणजे सीतेने दिली तशीच ना ! स्नेहा आजी म्हणाली, "बरोब्बर !"

संजीवनी मिळणे हा अजून एक लोकप्रिय वाक्प्रचार म्हणजे रामायणाचीच देणगी आहे असे सांगत सौ. ने हि पद्मजाच्या ज्ञानामध्ये भर घातली. मरण पंथास लागलेल्या एखाद्या गोष्टीला नव्याने उर्जितावस्था येणे असा अर्थ सांगून सौ, स्नेहा आजीसाठी खिचडी घेऊन आली  

'आपले नाक कापून दुसर्याला अपशकुन करणे' हा वाक्प्रचार शूर्पणखा प्रकरणावरून तर आला नाही ना? असा अनपेक्षित प्रश्न करून पद्मजाने आम्हा सर्वांना आश्चर्य चकित केले

'संपूर्ण रामायण सांगून झाले तरी रामाची सीता कोण ?' असा  मजेशीर वाक्प्रचार सांगून स्नेहा आजीने रामायण पुराण बंद करायचे ठरविले. सर्व प्रकरण पद्धतशीरपणे समजावून देखील जेव्हा समोरच्या माणसाच्या डोक्यात प्रकाश पडत नाही तेव्हा हि म्हण वापरतात असा अर्थ पद्मजाने लिहून घेतला         

आजीची पारायणे संपली होती तिच्यासाठी सून बाईने आणलेली गरमा गरम खिचडी पण तयार होती म्हणूनच तिला शिकवणीतून मोकळी करण्यासाठी , आता महाभारताकडे वळू या असे म्हणत मी देखील या शिकवणीमध्ये सहभागी झालोमी पद्मजाला म्हटले महाभारतावरून सर्वात चटकन आठविणारा वाक्प्रचार म्हणजे भिष्मप्रतिज्ञा. याचा अर्थ होणार दृढ संकल्प करणे जो कोणत्याही परिस्थितीमध्ये मोडणार नाही . यावर डोळे चोळत , झोपेतून उठणारा सौमित्र म्हणाला, " पण मला महाभारत म्हटले कि आठवतो तो  भीष्मपराक्रम. भीष्मपराक्रम  म्हणजे अतुलनीय, अविश्वसनीय असा विजय. कधी कधी भीमकाय आव्हान  हि म्हण पण मी ऐकली आहे. ताई, भीमकाय आव्हान म्हणजे अशक्यप्राय आव्हान

सौमित्रची टोलेबाजी चालू असतानाच खिचडीची रिकामी झालेली प्लेट उचलायला चहा द्यायला आलेली सौ म्हणाली, मला मात्र महाभारत म्हटले कि जो वाक्प्रचार सहज आठवतो तो म्हणजे, "नरो वा कुंजरोवा". सदैव सत्य बोलणारा धर्मराज फक्त एकदाच खोटे बोलला असे सांगत प्राजक्ता पण आमच्या शिकवणी मध्ये परत एकदा सामील  झाली. नरो वा कुंजरोवा म्हणजे संदिग्ध विधान करणे ज्यातून सत्य लपविण्याचा प्रयत्न करणे असे स्पष्टीकरण मग पद्मजाच्या डायरी मध्ये नोंदले गेले. कृष्ण शिष्टाई असा दुसरा एक वाक्प्रचार प्राजक्तानेच पद्माजाला लिहून घेण्यास सांगितले. प्रतीपक्षाशी अंतिम समयी केलेल्या वाटाघाटी म्हणजे कृष्ण शिष्टाई असे सांगून माझी सौ सकाळची घरकामे उरकण्यासाठी स्वयंपाक घराकडे वळली. पण त्या आधी 'चक्रव्यूहामध्ये अडकणे' 'हा सूर्य हा जयद्रथ' असा गृहपाठ द्यायला ती विसरली नाही 

आमच्या शिकवणी मध्ये आता दुसरी आजीही सामील झाली. झारीतील शुक्राचार्य हि एक हटके म्हण रश्मी आजीने सुचविली. एखाद्या चांगल्या कामात विघ्न निर्माण करणाऱ्या व्यक्तीला असे म्हणतात असे सांगून रश्मी आजीनेच पद्मजाचे कुतूहल शमविले.

आल्या हाती राजा हरिश्चंद्राचा अवतार हि दुसरी म्हण पण रश्मी आजीनेच सांगितली. अत्यंत खरे बोलणाऱ्या तत्वाला जागणाऱ्या माणसाला राजा हरिश्चंद्राचा अवतार म्हणतात असे पद्मजाला कळल्यावर ती पटकन म्हणाली, "या कलियुगात अशी व्यक्ती सापडणे महाकठीण ! "
तोच धागा पुढे पकडत सौमित्र म्हणाला, “कर्णाचा अवतार म्हणजे अत्यंत उदार माणूस
आता सगळ्या लोकांनाच शाळेत किंवा ऑफिसला जायचे होते त्यामुळे आम्ही हि शिकवणी इथेच थांबवत पुन्हा संध्याकाळी भेटायचे ठरविले. रुटीन प्रमाणे मी जेव्हा संध्याकाळी ऑफिसमधून घरी आलो  तेव्हा चहा पोहे हातात देत पद्मजा म्हणाली, " काका, माझा गृहपाठ तयार आहे. चक्रव्युहात अडकणे म्हणजे चार हि बाजूनी संकटामध्ये सापडणे त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग सुचणे हा सुर्य हा जयद्रथ म्हणजे जागच्या जागी पुरावा देऊन एखाद्या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावणे


त्यावर हसत हसत मी म्हणालो, आज आपण पुराणातील वांगी खूप उकरून काढली; आता रात्रीच्या जेवणात तुझ्या काकूला खमंग वांग्याचे भरीत भाकरी करायला सांगूया. म्हणजे खऱ्या अर्थाने या शिकवणीचे सार्थक होईल   

#प्रशांत दांडेकर
#मराठीपंधरवडा

No comments:

Post a Comment