Saturday 16 January 2016

भाषेचे वैशिष्ट्य

# शिक्षणावर बोलू काही #
➖➖➖➖➖➖➖➖➖➖

जगात असंख्य भाषा आहेत. प्रत्येक भाषेचे आपले एक वैशिष्ट्य असते. भारतीय भाषांचे खास वैशिष्ट्य आहे ते म्हणजे स्पष्ट उच्चारण. प्राचीन काळी यवनादी परकीय लोकांना ‘म्लेंच्छ’ म्हणत असत. त्याला कारण होेते. म्लेंच्छ् हा मूळ धातू असून ‘त्याचा अर्थ अस्पष्ट उच्चार’ असा आहे. म्हणजे जे अस्पष्ट उच्चार करतात ते म्लेंच्छ, हा अर्थ होता. याचाच अर्थ असा अभारतीय विशेषत: ‘यवन’ अस्पष्ट उच्चार करायचे. असो. हे सर्व सांगायचे कारण उच्चार ज्या तोंडावाटे म्हणजे कण्ठ, तालू, मूर्धा, दन्त, ओष्ठ यांच्या सह जिभेच्या साहाय्याने होतो तिचे वळण बालवयात संस्कारक्षम, वयातच लागायला पाहिजे. जसे मराठी बालकं ‘ळ’ चा उच्चार करू शकतात. पंजाबी उत्तरप्रदेशी प्रौढ तो उच्चार करू शकत नाहीत. कारण उच्चारणाचे संस्कार. मग बालवयात कोणते वर्ण उच्चार शिकवायला हवे? याचे नि:संदिग्ध उत्तर आहे ‘भारतीय’ भाषेचे. कारण इंग्रजीत अइउऊ इत्यादी २६ मुळाक्षरे म्हणजे ‘उच्चारण ध्वनी’ आहेत तर कोणत्याही भारतीय भाषांमध्ये इंग्रजी पेक्षा जास्त ध्वनी म्हणजे (वर्ण उच्चारण) आहे. पुढे भाषा व त्यातील वर्णसंख्या म्हणजे ध्वनी संख्या दिलेली आहे.

टेबलवरून सिद्ध होते की कोणतीही भारतीय भाषा इंग्रजीपेक्षा वर्णोच्चाराच्या बाबतीत श्रीमंत आहे. शिवाय उच्चार स्पष्टता ही भारतीय भाषांची खासीयत आहेच. जिभेचे वळण बालवयातच लागते हा सर्वांचा अनुभव आहेच. मग ग्लोबलायझेशनच्या क्रेझ मुळे इंग्रजी उच्चारण बालकाला शिकविणे हे कितपत योग्य आहे? याचा विचार इतरांचे जाऊ द्या पण पालक म्हणून आपण करणे जरुरीचे नाही का? लहानबालकांना भारतीय भाषांमधील अक्षरज्ञान वा वर्णमाला शिकविणे बालकाच्या दृष्टीने अधिक लाभदायी नव्हे का?

मग बालकाला ए फॉर ऍपल पेक्षा अ, आ, ई शिकविणे जास्त गरजेचे नाही काय?

संस्कृत (वैदिक) ६४
संस्कृत (लौकिक) ५२
पाली ४३ किंवा ४१
हिंदी ४९
मराठी ४९
बंगाली ५२
तेलगू १६ + ४१
तामिल १३+ १८
गुजराती ४९
उर्दू ३६+१२
फारसी २९
अरेबी ३१
इंग्रजी २६
मल्याळम् १५+४१

- डॉ. प्रज्ञा देशपांडे

महाराष्ट्राचा इतिहास - ऑनलाईन परीक्षा

१. सातवाहन राजा हल याने पुढीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला?

पर्याय १ - गाथा सप्तशती


२. कैलास लेणे कोणाच्या काळात बांधून पूर्ण झाले

पर्याय ३ - राष्ट्रकुट


३. मोडी लिपीचा उद्गाता म्हणून कुणाला मानले जाते?

पर्याय ४ - हेमाडपंत/हेमाद्रीपंत


४. देवगिरीचा किल्ला कुणाच्या काळात बांधला गेला?

पर्याय २ - भल्लमदेव यादव


५. मौजा म्हणजे ........... होय.

पर्याय ३ - गाव


६. 'संकृत वाणी देवे केली | तरी प्राकृत काय चोरापासूनि झाली?' हे संस्कृत पंडितांना कुणी ठणकावून विचारले?

पर्याय ४ - संत एकनाथ


७. 'मराठा तितुका मेळवावा | महाराष्ट्र धर्म वाढवावा' हा उपदेश कुणी केला?

पर्याय १ - समर्थ रामदास


८. संत चळवळीचे ............. हे केंद्र होते.

पर्याय ४ - पंढरपूर


९. जे का रंजले गांजले | त्यांसी म्हणे जो आपुले ... तोची साधू ओळखावा | देव तेथेची जाणावा |

हा संदेश लोकांच्या मनावर कुणी बिंबवला?

पर्याय २ - संत तुकाराम


१०. घृष्णेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार कुणी केला?

पर्याय १ - मालोजी राजे भोसले


११. जिजाऊ आणि शिवरायांना आपल्या बरोबर कर्नाटकात घेऊन जाताना, पुणे जहागिरीचा कारभार शहाजी राजांनी, आपल्या कोणत्या विश्वासू सेवकावर सोपवला?

पर्याय १ - दादोजी कोंडदेव


१२. प्रतिपच्चन्द्रलेखेव वर्धिष्णुर्विश्‍ववन्दिता । शाहसूनो: शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते ।। - ही राजमुद्रा कोणत्या भाषेत आहे?

पर्याय ३ - संस्कृत

१३. जावळीच्या मोऱ्यांना चंद्रराव हा किताब कुणी दिला होता?

पर्याय २ - आदिलशहा

१४. 'अमात्य' या पदाचे कार्य कोणते?

पर्याय ४ - राज्याचा जमाखर्च पाहणे

१५. राज्यव्यवहारकोश या ग्रंथाची निर्मिती कुणी केली.

पर्याय १ - पंडित धुंडीराजलक्ष्मण व्यास

१६. सरदेशमुखी म्हणजे महसुली उत्पन्नाचा ................ होय.

पर्याय ३ - एक दशांश भाग

१७. पानिपतमध्ये झालेल्या पराभवानंतर उत्तरेत मराठ्यांची सत्ता पुनर्स्थापित करण्यात खालीलपैकी कोणाचा सिंहाचा वाटा होता.

पर्याय २ - महादजी शिंदे

१८. मराठ्यांनी श्रीरंगपट्टणजवळील, मोतीतलाव येथील लढाईत ................ याला पराभूत केले.
पर्याय ३ - हैदरली

१९. खाली दाखवलेल्या शस्त्राचे नाव काय?
पर्याय १ - कुकरी

२०. फोटोत दाखवलेल्या ढालीचा प्रकार कोणता?
पर्याय ४ - मराठा - कासवाच्या पाठीची ढाल

===============================

🚩मराठी भाषा पंधरवडा 🚩
➖➖➖➖➖➖➖➖➖

💡दिवस - शेवटचा 

विषय - महाराष्ट्राचा इतिहास (संत परंपरा, राजे-महाराजे, शस्त्रास्त्रे)

निकाल खालीलप्रमाणे :

१. विकास धात्रक - 1/15/2016  9:39:27 PM - १९ गुण - मुंबई 

२. रामदास कालोथे - 1/15/2016  9:20:57 PM - १८ गुण - अहमदनगर

३. हनुमंत लोखंडे - 1/15/2016  9:24:44 PM - १७ गुण - बीड 

४. निवेदिता खांडेकर - 1/15/2016  9:55:52 PM - १७ गुण - नवी दिल्ली

सर्वांचे अगदी मनापासून अभिनंदन💐

      || ज्ञानभाषा मराठी ||
|| माझी शाळा📚माझी भाषा ||

गझलची तोंड ओळख - भाग १६

: गझल वृत्त :
          सौदामिनी

🎶 एकूण मात्रा : 18

♻लगावली (लघु , गुरू क्रम)

ल गा गा ल गा गा ल गा गा ल गा
1  2  2  1  2  2  1  2  2  1  2
= 18

(गा - गुरू , ल -लघु)



मला गाव जेव्हा दिसू लागले
लुळे पाय माझे रुसू लागले

लपंडाव माझातुझा संपला
तुझे तेच माझे असू लागले

तुझ्या अंतरी कोणती वादळे ?
मला हेलकावे बसू लागले

तुझी पाहता पाकळीपाकळी
गडे , पाहणेही फसू लागले

अशी ही कशी तीच ती उत्तरे ?
मला प्रश्न माझे हसू लागले

कुठे संपल्या रोजच्या यातना ?
पुन्हा हे दिलासे डसू लागले

कसा मी रडू ? हे कसे लोकही ?
स्वतःचेच डोळे पुसू लागले
            (सुरेश भट)

गझलची तोंड ओळख - भाग १५

🚩मराठी भाषा पंधरवडा🚩
📝 गझलची तोंड ओळख - भाग 15 📝
✒संकलन : डॉ. अमेय गोखले. ✒

💐💐💐💐💐💐💐💐💐

♻ आज काही निवडक , गाजलेल्या मराठी गझल देत आहे ♻


तरुण आहे रात्र अजुनी राजसा निजलास का रे ?
एवढ्यातच त्या कुशीवर तू असा वळलास का रे ?

अजुनही विझल्या न गगनी , तारकांच्या दीपमाला
अजुन मी विझले कुठे रे ? हाय ! तू विझलास का रे ?

सांग, ह्या कोजागरीच्या , चांदण्याला काय सांगू ?
उमलते अंगांग माझे.. आणि तू मिटलास का रे ?

बघ तुला पुसतोच आहे , पश्चिमेचा गार वारा
रातराणीच्या फुलांचा , गंध तू लुटलास का रे ?

उसळती हुदयात माझ्या , अमृताच्या धुंद लाटा
तू किनार्‍यासारखा पण , कोरडा उरलास का रे ?
                      (सुरेश भट)


मालवून टाक दीप , चेतवून अंग अंग
राजसा किती दिसात , लाभला निवांत संग

त्या तिथे फुलाफुलात , पेंगते अजून रात
हाय तू करू नकोस , एवढयात स्वप्नभंग

दूर दूर तारकांत , बैसली पहाट न्हात
सावकाश घे टिपून , एक एक रूपरंग

गार गार या हवेत , घेऊनी मला कवेत
मोकळे करुन टाक , एकवार अंतरंग

ते तुला कसे कळेल , कोण एकटे जळेल
सांग का कधी खरेच , एकटा जळे पतंग

काय हा तुझाच श्वास , दरवळे इथे सुवास
बोल रे हळू उठेल , चांदण्यावरी तरंग
                 (सुरेश भट)


आताच अमृताची बरसून रात गेली
आताच अंग माझे विझवून रात गेली

मजलाच, हाय, माझे जपता न भान आले
मजलाच ऐनवेळी उधळून रात गेली

उरले जराजरासे गगनात मंद तारे
हलकेच कूस माझी बदलून रात गेली

अजुनी सुगंध येई दुलईस मोगर्‍याचा..
गजरा कसा फुलांचा विसरून रात गेली ?
                 (सुरेश भट)


सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या , तुझेच मी गीत गात आहे
अजुन ही वाटते मला की , अजुन ही चांद रात आहे

कळे ना मी पाहते कुणाला , कळे ना हा चेहरा कुणाचा
पुन्हा पुन्हा भास होत आहे , तुझे हसू आरशात आहे

सख्या तुला भेटतील माझे , तुझ्या घरी सूर ओळखीचे
उभा तुझ्या अंगणी स्वरांचा , अबोल हा पारिजात आहे

उगीच स्वप्नांत सावल्यांची , कशास केलीस आर्जवे तू
दिलेस का प्रेम तू कुणाला , तुझ्याच जे अंतरात आहे
                           (सुरेश भट)


केव्हातरी पहाटे , उलटून रात गेली
मिटले चुकून डोळे , हरवून रात गेली

कळले मला न केव्हा , सुटली मिठी जराशी
कळले मला न केव्हा , निसटून रात गेली

सांगू तरी कसे मी , वय कोवळे उन्हाचे ?
उसवून श्वास माझा , फसवून रात गेली !

उरले उरात काही , आवाज चांदण्याचे..
आकाश तारकांचे , उचलून रात गेली !

स्मरल्या मला न तेव्हा , माझ्याच गीतपंक्ती
मग ओळ शेवटाची , सुचवून रात गेली !
                  (सुरेश भट)


रंगुनी रंगांत साऱ्या रंग माझा वेगळा!
गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा!

कोण जाणे कोठुनी ह्या सावल्या आल्या पुढे;
मी असा की लागती ह्या सावल्यांच्याही झळा!

राहती माझ्यासवे ही आसवे गीतांपरी;
हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा!

कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो
अन् कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा ?

सांगती 'तात्पर्य' माझे सारख्या खोट्या दिशा :
'चालणार पांगळा अन् पाहणारा आंधळा !'

माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी :
माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा !
                     (सुरेश भट)


डोळ्यांत सांजवेळी आणू नकोस पाणी
त्या दूरच्या दिव्यांना सांगू नको कहाणी

कामांत गुंतलेले असतील हात दोन्ही
तेव्हा नको म्हणू तू माझी उदास गाणी

वाटेवरी खुणेच्या शोधू नको फुले ती
ना ठेविते फुलांची माती इथे निशाणी

कळणार हाय नाही दुनिया तुला मला ही
मी पापण्यांत माझ्या ही झाकिली विराणी
                 (मंगेश पाडगावकर)


मलमली तारुण्य माझे तू पहाटे पांघरावे
मोकळ्या केसात माझ्या तू जीवाला गुंतवावे

लागुनि थंडी गुलाबी शिरशिरी यावी अशी ही
राजसा माझ्यात तू अन् मी तुझ्यामाजी भिनावे

तापल्या माझ्या तनूची तार झंकारुन जावी
रेशमी संगीत स्पर्शाचे पुन्हा तू पेटवावे

रे तुला बाहूत माझ्या रुपगंधा जाग यावी
मी तुला जागे करावे तू मला बिलगून जावे
                     (सुरेश भट)


भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले !
एवढे मी भोगिले की मज हसावे लागले !

ठेविले आजन्म डोळे आपुले मी कोरडे
पण दुज्यांच्या आसवांनी मज भिजावे लागले !

लोक भेटायास आले काढत्या पायांसवे
अन्‌ अखेरी कुशल माझे मज पुसावे लागले !

गवसला नाहीच मजला चेहरा माझा कधी
मी कशी होते मलाही आठवावे लागले !

एकदा केव्हातरी मी वचन कवितेला दिले;
राखरांगोळीस माझ्या गुणगुणावे लागले !
                   (सुरेश भट)


🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
✒ संकलन : डॉ. अमेय गोखले. ✒
💐💐💐💐💐💐💐💐💐

पानिपत! पराभव नव्हे तर गुरुदक्षिणा

कौरव पांडव संगर तांडव द्वापर काली होय अति,
तसे मराठे गिलिचे साचे कलित लढ़ले पानिपती॥

- १४ जानेवारी १७६१, राष्ट्रावरचं संकट मराठ्यांनी आपल्या छातीवर झेललं. मराठे गिलच्यांविरुध्द एकाकी झुंझले. अभिमन्यूप्रमाणे झुंझत झुंजत देह ठेवला. उभ्या भारतातून एक हरीचा लाल मराठयांबरोबर पाय रोवून पानिपतात उभा राहिला नाही. मराठ्यांनी पाय गाडून युध्द केलं. रक्त मांसाचा चिखल झाला. मराठ्यांचा भावी पेशवा मारला गेला. पुण्यातल्या प्रत्येक घरातला एक जण तरी पानिपतावर कापला गेला. "दो मोती गलत, दस-बीस अश्राफात, रुपयोंकी गिनती नही|"

पण माझ्या दृष्टीने पानिपतावरती झालेला पराभव हा खरा पराभव नाही. कारण १८व्या शतकाच्या शेवटि तब्बल १४ वर्ष लाल किल्यावरती "भगवा" फडकत होता हा इतिहास आहे. मराठ्यांनी दिल्लीची वजीरीच नव्हे जर सगळी दिल्लीच पुन्हा मांडिखाली दाबली हा खरा इतिहास आहे. महादजी शिंद्यांनी एकेका रजपुताला सुटा करुन करुन पिदवला हा खरा इतिहास आहे, "गढ मै गढ चित्तोड गड बाकि सब गढियॉ।" म्हणून लैकिक मिळवलेला किल्ला जवळपास आठ महीने लढल्यावर आणि डोळे पांढरे व्हावेत इतका तिखट प्रतिकार झाल्यावर ’महान’ सम्राट अकबराला मिळाला होता ..... मराठ्यांनी बोल - बोल म्हणता तो १८ दिवसांत जिंकला होता हा खरा इतिहास आहे. नजिबाचा नातू "गुलाम कादिर" याने "अली गोहर" बादशहाला आंधळे केल्याबद्दल व बादशाहाच्या कुलातील स्त्रीयांना भर दरबारात नग्न केल्याची शिक्षा म्हणून मराठ्यांनी त्याला टाचेकडून मानेकडे जिवंत सोलून ठार मारला होता व नंतर दिल्लीच्या लाहोरी दरवाज्याजवळ ३ दिवस बिन मुंडक्याचा उलटा टांगून ठेवला होता हा खरा इतिहास आहे. पानिपताला जबाबदार असलेल्या नजीबाची कबर मराठ्यांनी सुरुंग लावून उडवून दिली हा खरा इतिहास आहे..

म्हणूनच म्हणतोय खरा पराभव पानिपतावर नव्हे तर इतिहासाकडे बघण्याच्या दृष्टीकोनात झालाय, पुस्तकांच्या पानांवरती झालाय. दुसर्‍या महायुध्दातील दोस्तांच्या डंकर्कच्या पळपुटेपणाला कौतुकाने माना डोलावून "यशस्वी माघार" म्हणणारे मात्र पानिपतावर देह ठेवून राष्ट्र वाचवणारे पराभूत झाले असं म्हणतात तेव्हा त्यांची किव येते.

आज अडिचशे वर्षानी त्याच्याकडे बघताना केवळ "पराभव" म्हणून न बघता "गुरुदक्षिणा" म्हणून बघा. मराठ्यांनी शिवछत्रपतींना दिलेली "गुरुदक्षिणा". राष्ट्रावरचं संकट आपल्या छातीवर घ्यायची संथा त्या महामानवाने मराठ्यांना दिली होती. त्या संथेची गुरुदक्षिणा म्हणजे "पानिपत".

- सौरभ वैशंपायन.

गझलची तोंड ओळख - भाग १४

📝 गझलची तोंड ओळख - भाग 14 📝
✒संकलन : डॉ. अमेय गोखले. ✒

💥आजचे गझल वृत्त :
      सति जलौघवेगा

🎶 एकूण मात्रा : 24

♻लगावली (लघु , गुरू क्रम)

ल गा ल गा गा ल गा ल गा गा ल गा ल गा गा
 1 2  1  2  2  1  2  1  2  2  1 2  1  2  2
= 24

(गा - गुरू , ल -लघु)
💐💐💐💐💐💐💐💐💐

💥 आता उदाहरणे पाहू :


पुन्हा स्मशानी घडायचे ते घडून गेले
चितेवरी लोक जे नको ते रडून गेले

दिले कशाला नभास झोके तुझ्या स्वरांनी
कधीच गाणे तुझे मला शिंपडून गेले

अरे नसे हा सवाल माझ्याच आसवांचा
युगायुगांचे रुमाल सारे सडून गेले

करू तरी काय सांग माझ्या कलंदरीचे ?
कसा फिरू ? आसवांत रस्ते बुडून गेले

कुणाकुणाची किती किती खंत बाळगू मी ?
अताच आयुष्यही शिवी हासडून गेले

सुगंध तो कालचा तुला मी कुठून देऊ ?
अखेरचे थेंब अत्तराचे उडून गेले
                 (सुरेश भट)


जुना जरीही पराभवाशी करार आहे
मनात माझ्या बगावतीचा विचार आहे

पहा म्हणाले पवित्र आहे नदी तिथे ती
पुढे जाऊनी खरे पहाता गटार आहे

तनामनाची पुन्हा कुणाला विकून लज्जा
गुलाम बनुनी जगावयाला नकार आहे

बुरेपणाचा उगाच सल्ला कुणास देऊ ?
भलेपणाही इथे तयांचा उधार आहे

लढा म्हणाला इथे अम्हाला पुढे करोनी
तुरूंगवासी अम्ही , अता तो फरार आहे
          (कवी डॉ. अमेय गोखले)


जुने पुढारी तपासतो आजकाल आम्ही
नवे नवे ओळखून घेतो दलाल आम्ही

बघून घ्या आज आमुची ही भणंग वस्ती
सुधारतो आज लोकशाही बकाल आम्ही

म्हणाल त्याला मते अम्ही नेहमीच देऊ
युगायुगांचे गुलाम आम्ही , हमाल आम्ही

जुन्या गुन्ह्यांची समर्थने एवढी कशाला ?
विचारला का तुम्हा 'नको तो' सवाल आम्ही ?

अलीकडे उद्धरून जातात सर्व पापी
तयांस पापे करू तयांची बहाल आम्ही

मिळेल तेव्हा मिळेल तो सूर्य चोरलेला
निदान ही पेटतीच ठेवू मशाल आम्ही

उद्यावरी सोपवू नये फैसला उद्याचा
अखेरचा चोख लावू निकाल आम्ही
                   (सुरेश भट)


तुझ्या नभाला गडे किनारे अजून काही
तिथेच जाऊन वेच तारे अजून काही

जरी सुखाच्या निवांत दारास मी नकोसा
खुली व्यथांची सताड दारे अजून काही

तसा न रसात्यात आज धोका मला परंतू
घरात येतात वाटमारे अजून काही

गडे मला सांग तूच माझी-तुझी वदंता
विचारते गाव हे बिचारे अजून काही

करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची
रणात आहेत झुंजणारे अजून काही

विझून माझी चिता लोटली युगे तरीही
विझायचे राहिले निखारे अजून काही
                (सुरेश भट)


तुझ्याचसाठी निळे चांदणे भुलून येते
तुझ्याचसाठी वेल फुलांनी फुलून येते

एक इशारा नजरेचा हा तुझ्या पुरेसा
वार्‍याच्या ओठांवर गाणे जुळून येते

तू जेव्हा प्रतिबिंब आपले तळ्यात बघसी
टपोर कमळांनी हे पाणी खुलून येते

प्राजक्ताचे झाड तसे आकाश निळे हे
झुकते खाली , तुझ्या घरावर झुलून येते

तुझी खुषी हा मोहरण्याचा उत्सव असतो
जगणे अपुला अर्थ नव्याने कळून येते
             (मंगेश पाडगावकर)


दिलास तू शाप जीवनाच्या उनाडकीचा
विचारला मीच प्रश्न तेव्हा तुला चुकीचा

अताच सारे कसे इथे शांत शांत होते
अताच मी ऐकला पुन्हा बार बंदुकीचा

कशास मी रक्त दाखवू आपुले कुणाला ?
अजूनही घाव हा तसा त्या न लायकीचा

अता इथे राहतात आवाज हुंदक्यांचे
खरेच हा गाव माणसांच्या भुताटकीचा

जरी तुझ्या पाकळ्यांत मी गुंतलो तरीही
गडे , तुझा हा सुगंध माझ्या न मालकीचा

अता जगू चांदण्यातल्या चाहुलींप्रमाणे
करार माझा-तुझा असा ह्या चुकामुकीचा
                 (सुरेश भट)

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
✒ संकलन : डॉ. अमेय गोखले. ✒
💐💐💐💐💐💐💐💐💐

मराठी मेवा - नमस्ते कुसुमाग्रजा

मराठी मेवा - दिवस तेरावा - क्रमांक १३

कविता : नमस्ते कुसुमाग्रजा

कवयित्री: सौ. मेधा श्रीश कामत

काव्यवाचन : सौ. यामिनी तेलंग

कविवर्य कुसुमाग्रजांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन! नमस्ते कुसुमाग्रजा! नमस्ते कुसुमाग्रजा! सय ठेवूनी गेलात गोड हिरव्या मखमली नि रेशीम बंधनात किमया तुमच्या जादूभऱ्या शब्दांतुनी जगता सजविले कुसुमे तुम्ही पसरुनी हळूवार प्रेमभावना त्यातुनी स्रवती आजही चिरतरुण मने हृदयस्पर्श अनुभवती भवतीच्या ऋतुंची किमया रुजविली मनोमनी त्या सामर्थ्ये आजही फुले गंधित फुलती जीवनी निष्पर्ण रानी फुलविली कधी प्रेममाया कधी जागविली वीरता ललकारुनी धैर्या ऋषीतुल्य तुम्ही, गुरुस्थानी आम्हा वारसा दिधला वंद्य तुम्ही आम्हा द्या गोडवा वाणीचा नि लेखणी तेजाची जन्मलो या भारती, सेवा करु मराठी मायबोलीची द्या आशीर्वाद, कवीश्वर तुम्ही प्रतिभावंत पूज्य तुम्ही, करतो मानाचा मुजरा आम्ही भाग्यवंत

- सौ. मेधा श्रीश कामत