Wednesday 6 January 2016

गझलची तोंड ओळख - भाग ६

🚩मराठी भाषा पंधरवडा🚩
📝 गझलची तोंड ओळख - भाग 6 📝
✒संकलन : डॉ. अमेय गोखले. ✒

💥आजचे गझल वृत्त :
           कालगंगा

🎶 एकूण मात्रा : 26

♻लगावली (लघु , गुरू क्रम)

गा ल गा गा गा ल गा गा गा ल गा गा गा ल गा
2  1  2   2  2  1  2  2  2  1  2  2  2  1  2
= 26

(गा - गुरू , ल -लघु)
💐💐💐💐💐💐💐💐💐

💥 आता उदाहरणे पाहू :



दुःख ज्याने भोगले तो का सुखाला भाळतो
तू मला सांभाळ आता , मी तुला सांभाळतो

लागले हातास काटे , रक्तही आले पहा
जो कुणी काट्यास भ्याला , तो फुलांना टाळतो

खिन्न ही वेळा असू दे , मी फुले ही आणली
तू अता माळून घे ही , मी तुला ही माळतो

ध्वस्त भिंतींचे उभे देऊळ प्रत्येकामधे
मी उभा राहून तेथे जीव माझा जाळतो

जाळणार्‍या वेदनेला शब्द मी नाही दिला
मी तुला होता दिला तो शब्द आता पाळतो
             (मंगेश पाडगावकर)


काळजाचे घाव हे , आता भरावे वाटते
पावलांना येथुनी मागे फिरावे वाटते

एक चाकोरी जगाची मोडली नाही कधी
मात्र आता त्यापुढे काही करावे वाटते

झगडुनी जो प्राक्तनाशी राहतो येथे उभा
पाय जेत्याचे अशा मजला धरावे वाटते

या जगासाठी करोनी , चांगले काहीतरी
एक माझे नाव हे मागे उरावे वाटते

'माय-भू'ला तारणारे येऊ दे आता पुन्हा
क्लेश तिचिया भाळिचे सारे सरावे वाटते

वाट मी पाहू किती , राहून एकाकी इथे
माझियासाठी अता कोणी झुरावे वाटते
          (कवी डॉ. अमेय गोखले)


सावल्यांच्या काफिला हा चालला आहे कुठे ?
जीवनाचा हा बहाणा चालला आहे कुठे ?

चेहरे ओसाड यांचे , टांगले खांद्यावरी
आंधळा काळोख सारा , चालला आहे कुठे ?

लोटती हे एकमेका , कोडगी यांची नशा
झिंगला बाजार यांचा चालला आहे कुठे ?

घोषणांनी व्यापिती हे अंतरीची रिक्तता
आत्महत्यांचा जथा हा चालला आहे कुठे ?

थुंकती सूर्यावरी हे , शौर्य यांचे केवढे !
बुड्बुड्यांचा हा तमाशा चालला आहे कुठे ?

पावतो ना देव यांचा एकही लाचेविना
भेकडांचा धर्ममेळा चालला आहे कुठे ?
           (मंगेश पाडगावकर)


रंगुनी रंगात सार्‍या , रंग माझा वेगळा
गुंतुनी गुंत्यात सार्‍या , पाय माझा मोकळा

कोण जाणे कोठुनी ह्या सावल्या आल्या पुढे
मी असा की , लागती ह्या सावल्यांच्याही झळा

राहती माझ्यासवे ही आसवे गाण्यांपरी
हे कशाचे दुःख , ज्याला लागला माझा लळा

कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो
अन् कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा

सांगती तात्पर्य माझे , सारख्या खोट्या दिशा
"चालणारा पांगळा अन् पाहणारा आंधळा"

माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी
माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा
                     (सुरेश भट)


कल्पनांच्या कुंचल्यातुन , व्यक्त होती अक्षरे
अंतरीच्या भावनांना , रूप देती अक्षरे…

ऐकले आहे कुठे का , लेखणी गाते कधी ?
ती पहा माझ्याचसाठी  , गीत गाती अक्षरे…

जे कुणा जमणार नाही , सांगणे नजरेतुनी
सांगुनी ते काळजाचा , ठाव घेती अक्षरे…

गैरसमजातून थोडासा अबोला वाढता
आणखी जवळी पुन्हा , घेऊन येती अक्षरे…

कैफ मद्याचा कशाला , ही पुरे आहे गझल
ऐकणार्‍याला नशा , देऊन जाती अक्षरे…
           (कवी डॉ. अमेय गोखले)


भोगले जे दुःख त्याला , सुख म्हणावे लागले
एवढे मी भोगले की , मज हसावे लागले

ठेविले आजन्म डोळे आपुले मी कोरडे
पण दुज्यांच्या आसवांनी , मज भिजावे लागले

लोक भेटायास आले , काढत्या पायांसवे
अन् अखेरी क्षेम माझे मज पुसाया लागले

गवसला नाहीच मजला चेहरा माझा कधी
मी कसा होतो मलाही आठवावे लागले

पांगळे आयुष्य थकुनी , बैसले वाटेवरी
जागच्या जागीच मजला , परत यावे लागले

एकदा केव्हातरी मी वचन कवितेला दिले
राखरांगोळीस माझ्या गुणगुणावे लागले
                     (सुरेश भट)


🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
✒ संकलन : डॉ. अमेय गोखले. ✒
💐💐💐💐💐💐💐💐💐

No comments:

Post a Comment