Wednesday 6 January 2016

'कथेमागची कथा'

🚩मराठी भाषा पंधरवडा🚩

✒कथा लेखन विशेष✒

👉🏾 शीर्षक : 'कथेमागची कथा'
👉🏾 लेखक : डॉ. अमेय गोखले , रत्नागिरी.

💐💐💐💐💐💐💐💐💐

- कथेमागची कथा -



अवधूत हा एक उदयोन्मुख लेखक... आणि हो... आता मराठी चित्रपटांचा कथा-पटकथा लेखक म्हणून त्याची ओळख होऊ लागली होती. तशी वाचन-लेखनाची आवड अवधूतला पूर्वीपासून, अगदी शाळेत असल्यापासून होतीच. पण, ती फक्त एक छंद म्हणण्याएवढीच... मर्यादित.... म्हणजे सुरुवातीला फक्त आवड म्हणून तो आपल्यापुरतंच लिहायचा...जसं सुचेल तसं... पुढे पुढे थोडा आत्मविश्वास वाटल्यावर त्याने त्यातल्या काही कथा दिवाळी अंक, साप्तहिकं यामध्ये द्यायला सुरुवात केली. पण, आपण चित्रपट क्षेत्रात येऊ असा त्याने स्वप्नातसुध्दा विचार केला नव्हता. आणि तसा तो या क्षेत्रात आलाही अगदी अचानकच, अनपेक्षितपणे !

अवधूत तेव्हा काॅलेजच्या दुसर्‍या वर्षाला होता. त्याच्या काॅलेजने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी एका प्रतिष्ठेच्या ‘इंटरकाॅलेज’ नाट्यस्पर्धेत भाग घेतला होता. त्या स्पर्धेच्या नियमा नुसार नाटकाच्या कथेपासून सगळ्या गोष्टी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनीच करणं बंधनकारक होतं... आणि या वर्षीच्या नाटकाची कथा अवधूतची असावी, अशी इच्छा प्राचार्यांनी व्यक्त केली. कारण, गेल्यावर्षीच्या एका स्थनिक दिवाळी अंकात प्राचार्यांनी त्याची एक कथा वाचली होती आणि त्यांना ती खूप आवडली होती... झालं ! प्राचार्यांनी अवधूतला बोलावून घेतलं आणि त्याच्यावर नाटकाची जबाबदारी सोपवली. अवधूतने सुध्दा आनंदाने ती जबाबदारी स्वीकारली. आणि खूप कमी वेळात स्पर्धेसाठीच्या नाटकासाठीची नवीन संहिता लिहिली. संवादही लिहून पूर्ण केले काॅलेजच्या मुलांनीच ते नाटक बसवलं... स्पर्धा पार पडली. आतिशय प्रसिध्द आणि प्रतिष्ठेच्या त्या स्पर्धेतून अवधूतला आपोआपच नाव मिळालं ! आणि विशेष म्हणजे, मराठी चित्रपट क्षेत्रातील एका प्रथितयश दिग्दर्शकाने अवधूतच्या या कथेची दखल घेतली. त्यांनी अवधूतला बोलावून घेतलं आणि त्याच्या त्याच कथेवर सिनेमा बनवण्याची इच्छा व्यक्त केली. अवधूतसाठी ही बाब खूपच अनपेक्षित,पण तेवढीच आनंदाची होती. सहजिकपणे तो लगेचच तयार झाला. आपल्या कथेवर त्याने सिनेमाच्या दृष्टीने आणखी काम केलं. पुढे सिनेमा पूर्ण झाला; आणि प्रदर्शनानंतर चांगला यशस्वीही झाला. अवधूतने आपल्या पहिल्याच चित्रपटातून आपली ओळख निर्माण केली होती. खूप कमी वेळात या सगळ्या घडामोडी घडल्या होत्या...

पुढे काॅलेजनंतरच्या चारच वर्षात अवधूतच्या नावावर तीन मराठी चित्रपट होते आणि तेही यशस्वी ! अवधूतचं लेखन तर चांगलं होतंच, पण त्याची विषयांची निवडही  तेवढीच चांगली होती. म्हणूनच पठडीतल्या सिनेमांपेक्षा वेग ळी कथानकं दिल्यामुळे अवधूतला यश मिळत होतं. अर्थात, यश कितीही ‘अनपेक्षित’पणे मिळालं, तरीही ते ‘सहज’ नक्कीच मिळत नाही. त्यामागे परिश्रम असतातच.....!!!


                   .........


अवधूत त्याच्या खोलीत एकटाच बसला होता , आपल्याच तंद्रीत... आपल्या टेबलसमोर... उजव्या हातात पेन आणि डाव्या हाताच्या मिटलेल्या मुठीवर कपाळ विसावलेलं... डोळे मिटून तो काहीतरी विचार करत होता. समोर काही कागदांचा गठ्ठा पडलेला होता; आणि जवळच अगदी हळू आवाजात नेहमीप्रमाणे रफीची गाणी चालू होती..... बाबा त्याच्या खोलीत येऊन मागे कधी उभे रहिले, हे सुध्दा न कळण्याएवढा तो विचारमग्न होता. अवधूत काहीतरी लिहायला बसला असावा, असा बाबांनी अंदाज बांधला. पण, समोरचे कागद अजूनही कोरेच होते. ‘म्हणजे काहीतरी नवीन विषय दिसतोय !’ बाबा मनातच म्हणाले...

बाबांनी अवधूतच्या खांद्यावर हात ठेवला, तसा अवधूत दचकलाच ! त्याने चमकून मागे बघितलं आणि नंतर हातातल्या घड्याळाकडे... ‘बाबा ऑफिसमधून आलेसुध्दा ! म्हणजे आपली कितीवेळ तंद्री लागली होती?’ याचा त्याने मनातच हिशोब केला...

“ बाबा, कधी आलात तुम्ही ? ”

“ हा काय, आत्ता येतोय एवढाच ! तुझं चालु दे... बरं चहा हवाय का? की घेऊन झाला तुझा? ”

“ नाही, घेईन तुमच्याबरोबरच...”

“ हं, ओक्के ! ” असं म्हणत बाबा आत गेले.

थोड्यावेळाने बाबा फ्रेश होऊन दोघांचा चहा घेऊन अवधूतच्या खोलीत आले. बघतात तर अवधूत पुन्हा विचारमग्न; आणि समोरचे कागद अजूनही कोरेच... बाबांना हे जरा वेगळं वाटलं. त्यांनी चहाचा कप अवधूतसमोर ठेवला आणि आता ते त्याला काही विचारणार, एवढ्यात तोच बाबांना म्हणाला,

“ अहो बाबा, एक चांगली बातमी आहे ! एक नवीन प्रोजेक्ट आहे. आज दुपारी मला ‘माऊली प्राॅडक्शन्स’ मधून फोन आला. स्वत: देशमुख बोलत होते. पुढच्या आठवड्यात बोलावलंय मला त्यांनी. म्हणाले, तुझी एखादी चांगली गोष्ट घेऊन ये... आवडली, तर तुझ्यासोबत काम करायला आवडेल आम्हाला ! ”

“ अरे व्वा ! चांगलंच आहे की मग ! पण तुझ्या चेहर्‍याचा रंग का उडालाय असा? ” बाबा म्हणाले...

“ अहो मग काय बाबा? महेश देशमुखांचा सिनेमा म्हणजे वाटते एवढी सोप्पी गोष्ट नहिये ओ ! त्यांचा ट्रॅक-रेकाॅर्ड महित्ये ना? त्यात या वेळी ते स्वत: डिरेक्ट करणारेत; म्हणजे, चांगली खणखणीत स्टोरी पहिजे या वेळी ! ”

अवधूत म्हणाला ते खरंच होतं. ‘माऊली प्राॅडक्शन्स’चा सिनेमा म्हटला, की एक वेगळं वजन असायचं... एक वेगळं आकर्षण असायचं... कारण त्यांचा सिनेमा वास्तवदर्शी तर असायचाच; पण महत्वाचं म्हणजे, इंडस्ट्रीतला तोच तो ठरविक मसाला न वापरता बनवलेला असायचा... त्यांच्या प्रत्येक सिनेमाची ताकद मूळ कथेत असायची. त्यामुळे भव्य सेट्स, मारझोड किंवा गोळीबार, आति-श्रीमंती किंवा आति-दारिद्र्य अशा कोणत्याही भडकपणाचा त्यांनी आजवर कधीच वापर केला नव्हता. देशमुखांनी स्वत:हून आॅफर द्यावी, या पेक्षा बहुमान नाही, हे अवधूतला महिती होतं; पण दुसरीकडे, आपल्यावरची जबाबदारी वाढल्याची जाणीवही त्याला होती. म्हणूनच त्याने आपल्या लिहून तयार असलेल्या गोष्टींचा विचार न करता एखादी नवीन गोष्ट लिहावी, असा विचार केला !

“ बाबा, अशी चांगली संधी पुन्हा पुन्हा नाही मिळत. म्हणून मी एखादी नवीन गोष्ट लिहून त्यांना ऐकवायचं म्हणतोय ! ”

“ हं ! बरोबर आहे तुझं ! मग कोणता विषय निवडलायस या वेळी? ”

“ तोच तर सुचत नहिये ना बाबा ! त्याचाच विचार करतोय एवढा वेळ ! कारण, ‘महेश देशमुखांचा पुढचा सिनेमा कोणत्या विषयावर असणार?’ याची उत्सुकता अख्ख्या महाराष्ट्राला असते.”

“ खरं आहे ! त्याच तोडीचा विषय पहिजे। एकदा का विषय त्यांना आवडला की प्रश्नच मिटला; कारण पुढे तू तो चांगल्या प्रकारे मांडलेलाच असणार, याची खात्री आहे मला ! ” बाबा आश्वासकपणे म्हणाले.

अवधूत हसला खरा, पण त्याच्या हसण्यात एक हरवलेपण होतं. अजूनही तो आपल्याच प्रश्नात गुरफटलेला होता.

“ बाबा, मला यावेळी अशी गोष्ट लिहायचीये, जशी मी आत्तापर्यंत कधीच लिहिलेली नाही आणि जसा सिनेमा महेशसरांनीही केला नसेल ! एकदम पठडी सोडून...”

“ तुला खरं सांगू? विषय जेवढा वास्तवातला असेल, तेवढाच तो प्रेक्षकांना आवडतो. नुसता धांगडधिंगा असेल, तर प्रेक्षक तो थिएटरमध्येच विसरुन बाहेर पडतात. तुझ्या मागच्या तीन सिनेमांचं यश सुध्दा यातंच होतं ! तुझ्या सच्च्या कथेत... ! मग या वेळी तुला एकदम वेगळा विचार करायची गरजच काय? एखादी सत्यघटना शोधलीस तर आतिउत्तम...”

“ तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे बाबा पण, कदचित एवढ्या मोठ्या बॅनरचं दडपण आलं असेल मनावर... कारण मला विषयच सुचत नाहीये ! ”

“ अवधूत, मला एक सांग , सिनेमात नायकच नेहमी केंद्रस्थानी का हवा? आणि तुझ्या गोष्टीत नायक नसलाच तर? ”

“ तुम्ही काय म्हणताय बाबा? काहीतरी कळेल असं सांगा ! ” अवधूत जरा वैतागलाच !

बाबा हसून म्हणाले, “ अरे म्हणजे मला म्हणायचंय, की नेहमीचे सिनेमे काय दाखवतात? एकतर राज कपूर, मनोज कुमार किंवा आलिकडच्या त्या आमिर खान वगैरेंसारखा एखादा सोज्वळ आभिनेता घेऊन त्याला सर्वगुण-संपन्न किंवा सद्गुणाचा पुतळा असलेला नायक म्हणून दाखवायचा; नाहीतर एकदम गुंडगिरी किंवा अंडरवर्ल्ड मधल्या खलनायकाची कथा, की ज्यापेक्षा वाईट काही असूच शकत नाही. हिरो आणि व्हिलन... दोन्ही संकल्पना एकदम टोकाच्या.... ! ”

“ हं, खरं आहे.”     अवधूत बाबांचं म्हणणं लक्ष्यपूर्वक ऐकत होता. आणि त्याला ते पटतंही होतं.

“ पण प्रत्यक्ष आयुष्यात तसं नसतं ना रे ! मानवी स्वभावाच्या कितीतरी वेगवेगळ्या शेड्स बघायला मिळतात. म्हणजे एखादा माणूस असाही असतो, की तो विक्षिप्त म्हणावा तर तसा नाही, आणि साधा-भोळा म्हणावा, तर तसाही नाही... खरं तर तू आत्ता पठडी बाहेरची वेगळी गोष्ट वगैरे म्हणत होतास, तेव्हा मला एक असंच कॅरेक्टर आठवलं.”

आता अवधूतची उत्सुकता वाढत होती. बाबा थोडं थांबून पुढे म्हणाले.....

“ म्हणजे तो माणूस काही व्यसनी नाही, बायको-मुलांना मारझोड करणारा नाही, भांडखोर किंवा तापटही नाही; उलट लौकिकार्थाने किंवा वरवर बघता एखाद्याला आदर्श वाटावा, असा ! पण प्रत्यक्षात कमालीचा स्वार्थी, आत्ममग्न, ‘ओठात एक आणि पोटात एक’ म्हणतात तसा ! दुसर्‍याला आपल्या हेतूचा संशयही येऊ न देणारा... स्वत:च्या फायद्या-तोट्याचं गणित अचूक ! पण, समोरच्याच्या बाबतीत मात्र काहीच लक्षात न आल्याचा, भाबडेपणाचा आविर्भाव ! दुसर्‍याला सल्ला द्यायची वेळ आल्यावर सगळ्यात पुढे, पण आपल्याबाबतीत मात्र कमालीची गुप्तता..... ”

“ बाबा, तुम्ही कोणविषयी बोलताय? जरा डीटेल सांगा. म्हणजे मला लिहायला बरं ! ” अवधूत उत्साहाने म्हणाला.

“ अरे, तू त्या माणसाला बघितलेलंच नहियेस. मध्यंतरी माझं पोस्टींग रत्नगिरीला असताना मी पहिलंय त्यांना. ” बाबा म्हणाले.

“ मग मला सविस्तर सांगा पहिल्यापासून. ”

“ ठीक आहे. मी आपलं मला जमेल तसं सांगतो. त्यावरुन तुझं कथा-पटकथा वगैरे काय लिहायचं ते तू बघ... ”

दोघेही जाऊन गॅलरीतून बसले। बाबांनी गोष्ट पुढे सांगायला सुरुवात केली...



“  मी रत्नगिरीत असताना ज्या मुरलीधर कॉलनीत रहायचो, तिथली ही गोष्ट ! खरं तर कॉलनीत प्रत्येकाची स्वतंत्र घरं-बंगले होते. पण तिथल्या लोकांचं एकमेकांकडे येण-जाणं असायचं. सुधाकर काकांचं घर त्यापैकीच एक.....

 सुधाकर काका म्हणजे त्या काॅलनीमधील एक ज्येष्ठ नागरिक ! शिक्षक म्हणून निवृत्त झालेले... त्यामुळे आसपासच्या वस्तीचं आलिखित सल्लागारपद त्यांच्याकडे आलेलं। शैक्षणिक पार्श्वभूमी चांगली असलेल्या कुटुंबातून असल्यामुळे वाचन-लेखन या कडे कल असणं सहजिकच; शिवाय संगीताची आवडही ! शिक्षकी पेशाच्या नोकरीत बर्‍यापैकी जबाबदारीची पदं सांभाळलेली. चालणं-बोलणं-वागणं सगळंच एकदम प्रभावी ! दांडगा व्यासंग आणि वाक्यागणिक साखरपेरणी केलेलं बोलणं... ! एकदा हे ‘फर्स्ट इंप्रेशन’ निर्माण केलं, की मग समोर कुणीही असला, तरी त्याला खिशात टाकणं, हा सुधाकर काकांच्या डाव्या हातचा खेळ... !

तसं पहिलं, तर  सुधाकर काकांचं रहाणीमान शिस्तीचं, आखीव-रेखीव ! सकाळी, म्हणजे पहाटे लवकर उठायचं, पुजेसाठी फुलं काढायची, बाहेर थोडा फेरफटका मारुन यायचा... तोपर्यंत घरच्याच (पण सरकारी कनेक्शनच्या) नळाला पाणी येई ! मग घराशेजारी लावलेल्या झाडांना पाणी घालायचं. मग आंघोळ, आणि त्यानंतर यथासांग देवपूजा... दुपारच्या मधल्या मोकळ्या वेळात अंगणातल्या झोपाळ्यावर बसून मनमुराद वाचन चालायचं. दुपारी बाराच्या ठोक्याला जेवण; नंतर थोडी विश्रांती... संध्याकाळचा चहा झाला आणि उन्हं जरा कमी झाली, की चालायला बाहेर पडायचं. सुधाकर काकांचं हे चालणंसुध्दा त्यांच्या इतर गोष्टींसारखंच... अचूक... रोज संध्याकाळी एक तास चालणं झालंच पहिजे ! सत्तरी उलटली, तरी नियम कधी चुकला नव्हता. कधी एकटे, कधी कुणासोबत... पण चालणं हवंच...

संध्याकाळची त्यांची ही रपेट झाल्यावर कॉलनीतल्या वाचनालया बाहेरच्या कट्ट्यावर एक छोटेखानी सभाच भरायची ! काॅलनीतले विषय, सोसायटीच्या तक्रारी, कधी कुणाच्या वैयक्तिक, प्रतिनिधीक किंवा अगदी सामजिक समस्यांवर चर्चा रंगायच्या. आणि या सगळ्यात आपले सुधाकर काका असणं अनिवार्यच ! बरं, या सगळ्यानंतरही पुन्हा रात्रीचं जेवणही अगदी आठच्या ठोक्याला...

एकुणच, वरवर पहिलं, तर सुधाकर काका म्हणजे एक complete package होतं. त्यांच्या पत्नी वसुधा काकू या सुध्दा निवृत्त शिक्षिका. दोन्ही मुलं कमावती झालेली. या सगळ्यात एक गोष्ट मात्र मोठी आश्चर्यकारक होती. अगदी ‘सार्वजनिक काका’ म्हणवून घेण्याएवढं सामजिक स्वारस्य असणार्‍या सुधाकर काकांच्या व्यक्तिगत आयुष्यविषयी फारसं कुणाला काही महिती नव्हतं. काकांचे सख्खे नातेवाईकही त्याच शहरात असूनही त्यांचं जाणं-येणं नगण्य होतं, ही बाब सुध्दा विचार करण्यासारखी होती. पण, आपल्याभोवती चांगुलपणाचं-ज्येष्ठत्वाचं-परिपूर्णतेचं वलय उभारलेल्या सुधाकर काकांविषयी या अशा शंका कोणाच्या मनात आल्या असत्या, तरच नवल... !

वसुधा काकू मात्र स्वभावानं एकदम साध्या, भोळसर... कुणाच्या अध्यात ना मध्यात... काकांच्या शब्दात सांगायचं तर ‘वेडसर’... पूर्वायुष्यात नोकरीशिवाय त्या कधी बाहेर पडल्यायत, कुणाच्या व्यक्तिगत आयुष्यात नाक खुपसलंय, ढवळाढवळ केलीये, असं कुणालाच कधी आढळलं नव्हतं. निवृत्तीनंतर काही दिवस त्या काकांबरोबर संध्याकाळी चालण्यासाठी बाहेर पडताना दिसायच्या. वयोमानानुसार तब्येतीसाठी ते आवश्यकही होतंच. पण का कोण जाणे? त्यांचं ते बाहेर पडणं अचानक बंद झालं. आधी वाटलं, असेल असंच काही कारण; कंटाळा, घरातली कामं वगैरे... कारण काकांचा दिनक्रम अगदी सुरळीतपणे सुरु होता. काही दिवसांनी कळलं, काकू आजारी आहेत. आजार नेमका कोणता, ते काही कळलं नाही, पण काकू त्यानंतर घराबाहेर पडायच्या बंदच झाल्या. काकांच्या इतर अनेक गोष्टींसारखं काकूंच्या या आजाराचं स्वरुप मात्र गुलदस्त्यातच होतं ! घरी कोणी आलंच, तरी काका झोपाळ्यावर किंवा फार तर बाहेरच्या खोलीतच असायचे. त्यामुळे बाकी चौकशी जुजबीच व्हायची. सुरुवातीला, काकूंचं आजारपण काही किरकोळ असावं, असाच सर्वांचा अंदाज होता. फारतर वयोपरत्वे येणारं सांधेदुखीसारखं एखादं दुखणं असावं असं वाटत होतं... कारण, सकाळच्या बागकामापासुन रात्रीच्या चर्चासत्रांपर्यंत काकांची गाडी अगदी सुरळीतपणे सुरु होती; विषेश म्हणजे त्यांच्या वागण्या-बोलण्यातही कधी कसला बदल किंवा तणाव कोणाला जाणवला नव्हता.

प्रत्यक्षात मात्र वसुधाकाकूंचं आजारपण साधंसुधं किंवा किरकोळ नव्हतं. कोणत्या तरी गंभीर मनो-कयिक (सायको-सोमॅटीक) व्याधीनं त्यांना ग्रासलं होतं. आणि अल्पावधीतच त्यांच्या आजाराने असाध्यते पर्यंतचा प्रवास गाठला. मुलांनी उपचारांसाठी धावपळही केली. पण, तोपर्यंत काकूंनी अंथरुण जवळ केलं. काकांच्या ‘चांगल्या’ प्रतिमेमुळे किंवा त्यांना दुखावलं जाऊ नये म्हणून असेल कदचित ! पण, काकूंच्या आजारपणाचा विषय काकांकडे फारसा कुणी काढत नसे. आणि विषय निघालाच, तर काकांची प्रतिक्रिया सुध्दा ठरलेली असायची... “ जे काही बघावं लागेल, ते आपण उघड्या डोळ्यांनी बघायचं फक्त... आणि मी मनाची तयारी केलीये... ! ” पण, लोकांना हाही काकांचा खंबीरपणा वाटून त्याचं कौतुकच वाटायचं !

शेवटी व्हायचं तेच झालं ! या गंभीर आजारपणातच एका रात्री काकूंनी अखेरचा श्वास घेतला. सकाळीच त्यांच्या घराकडे वर्दळ वाढली. अंत्यदर्शनासाठी वेगवेगळ्या वेळी आलेल्या लोकांना काकांचं वेगवेगळं रुप पहायला मिळालं. म्हणजे कधी झोपाळ्यावर बसून चहा पिताना, तर कधी वर्तमानपत्र वाचताना...! काकांचा तोच प्रसन्न चेहरा, मधाळ बोलणं, सगळं अगदी नेहमी असायचं तस्संच ! चेहर्‍यावर मानसिक-आंतरिक उद्विग्नतेची झलकही नव्हती, शब्दांमध्ये दाटलेपण नव्हतं किंवा पापण्यांच्या कडांमध्ये ओलावाही !!!!! काकांच्या दारात विहीर होती, विहिरीवर पंपही होता. पण, त्या दिवशीही, त्या प्रसंगातही सुधाकर काकांनी आपल्या बगिचाला सरकारी नळाच्या पाण्यापासुन वंचित ठेवलं नाही.....!!!

सुधाकर काकांचं मांडलिकत्व स्वीकारलेल्या त्या सोसयटीवसियांना यात काही वेगळं-विचित्र असं वाटलं नसेलही कदाचित् किंवा कदाचित् त्यातही त्यांना काकांचा एखादा सद्गुणच दिसला असेल. काही त्रयस्थ व्यक्तींना काकांच्या या

वागण्याचं आश्चर्य वाटलंही... पण, ‘जाऊ दे, मला काय करायचंय !’ या मानवी स्वभावधर्मानुसार तेही काही बोलले नसावेत.

रितीनुसार काकूंची क्रियाकर्म, दिवसवार वगैरे झाले... पण, इकडे काका मात्र अजूनही आपल्या दिनक्रमात कोणतीही कसूर करत नव्हते... काकू गेल्या त्या दिवशीचं काकांचं वागणं हा कदचित त्यांना बसलेला मानसिक आघात असावा, असा काहीजणांनी गोड-गैरसमज करुन घेतला होता ! पण, खरं सांगायचं, तर त्या दिवसापूर्वी आणि त्या दिवसानंतर काकांच्या वागण्यात काहीच वेगळेपणा नव्हता. आजही ते त्याच घड्याळाप्रमाणे जगत होते. चर्चा रंगवत होते. स्वभिमान सुखावून घेत होते...

वसुधा काकू होत्या, तेव्हासुध्दा सुधाकर काकांच्या बोलण्यात त्यांचा उल्लेख नसायचा; आणि आताही नसतो.....!!! ”

             ×××××

अवधूत स्तब्धपणे ऐकत होता. फक्त एक लेखक म्हणूनच नव्हे, तर एक भावनाप्रधान माणूस असल्यामुळे ही गोष्ट त्याच्या मनाला भिडली होती.

‘खरंच, काय स्वभाव असतो एकेकाचा ! आपण विचारही करु शकणार नाही !’ अवधूत स्वत:शीच म्हणाला. अवधूत त्या गोष्टीवर विचार करत करत मनातच पुढची आखणी करत होता.

बाबा म्हणाले, “ अवधूत, मला ही गोष्ट सांगताना हा मुद्दा प्रभावीपणे मांडता आला नसेल कदाचित्; पण विषय तरी तुझ्या लक्षात आला असेलच ! तू तुझ्या पध्दतीने त्यात कमी-जास्त करुन लिही. खरंच एक चांगली गोष्ट होईल याची... ”

“ नाही बाबा ! तुम्ही सांगतानाच ही गोष्ट इतकी touch झाली, की मला यात आणखी काही मनाच्या गोष्टी घालून या characterची शेड आजिबात बदलायची नाहीये ! आणि मगाशी तुम्हीच म्हणालात ना? गोष्ट जेवढी सच्ची असेल, तेवढीच ती समोरच्याला किंवा प्रेक्षकांना पटते... ”

“ हं ! ” बाबांनी हसुन मान डोलावली...

“ मग मला तुमची अजून थोडी मदत लागेल बाबा ही गोष्ट लिहिण्यासाठी. ”

“ कसली मदत? ”

“ मी आणखी माझ्या मनाचे वेगळे प्रसंग या कथेत टाकून ती वाढवण्यापेक्षा तुम्ही तिथे असताना त्या सुधाकर काकांविषयी जे काही पहिलंय, ऐकलंय ते सगळं सांगा मला प्लीज ! ”

अवधूतने बाबांकडून सुधाकर काकांच्या आणखी बर्‍याचशा गोष्टी, सवयी जाणून घेतल्या. सुधाकर काकांची बोलण्याची पध्दत, त्यांच्या हालचाली, त्यांच्या पेहरावाची पध्दत, झोपाळ्यावर त्यांच्या तोंडी जास्त करुन असलेली गाणी, इतर गोष्टींमधल्या आवडी-निवडी, त्यांच्या जिव्हाळ्याचे विषय, वेगवेगळ्या माणसांशी-वेगवेगळ्या विषयावर बोलतानाच्या त्यांच्या interactions, आपल्या मुलांसोबत वागण्याची पध्दत... जेवढं बाबांना आठवत होतं, तेवढं सगळं त्याने विचारुन घेतलं...

एखादा कसलेला चित्रकार जसा कधी न पहिलेल्या जागेचं किंवा माणसाचं चित्र फक्त वर्णनावरुन रेखाटतो, तसंच अवधूतसमोर सुध्दा कधी न पहिलेल्या त्या सुधाकर काकांचं व्यक्तिचित्र उत्तमरित्या उभारायचं आव्हान होतं...

झालं... गोष्ट तर तयारच होती. आणि आता यात आणखी वेगळी कल्पनाशक्ती वगैरे वापरायची नाही, हे अवधूतने आधीच ठरवलं होतं. उत्तम भाषासामर्थ्य आणि अचूक मांडणी करत अवधूतने ती कथा चांगल्यरितीने लिहून पूर्ण केली. आणि लिहून झाल्यावर सगळ्यात आधी त्याने ती बाबांनाच ऐकवली.

मग ठरल्या दिवशी अवधूत ‘माऊली प्राॅडक्शन्स’चे मालक; निर्माते-दिग्दर्शक महेश देशमुखांना जाऊन भेटला. देशमुखांना ती गोष्ट वाचून दाखवली. देशमुखांना ती गोष्ट आवडली नसती, तरच नवल ! त्या गोष्टीने ते चांगलेच प्रभवित झाले. त्यांनी फक्त त्या गोष्टीचंच नव्हे, तर अवधूतचंही तोंड भरुन कौतुक केलं.

“ अवधूत, अरे कमाल आहे तुझी ! अरे या वयात तू हे असं, एवढं चांगलं लिहितोयस ! इंडस्ट्रीत अजून 10-15 वर्ष काढल्यावर तर तू कुठल्याकुठे पोहोचशील ! You are just awesome.....!!! ”

“ अहो तसं काही नहिये सर। Actually, माझ्या बाबांनी मला ही गोष्ट ऐकवलिये !” असं म्हणून अवधूतने या कथेमागची कथाच महेश सरांना ऐकवली.

“ ते सगळं ठीक आहे अवधूत ! पण अशी कुठली गोष्ट ऐकून मला तरी ती अशी तुझ्यासारखी लिहिता वगैरे आली नसती बुवा ! आणि तुझ्या यापूर्वीच्या कथा मी वाचलेल्याच नाहीत, किंवा तू लिहिलेली नाटकं-सिनेमे मी पहिलेले नाहीत, असं समजु नको... ते सगळं आवडलं म्हणूनच मी तुला फोन केला आणि तुला स्टोरी घेऊन बोलावलं, कळलं का? You have a bright future ahead ! No doubt ! ”

‘माऊली प्राॅडशन्स’ कडून लगेचच त्या प्रॉजेक्टला सुरुवात झाली आणि काही महिन्यातच त्या ‘साळसूद’ माणसावरचा सिनेमा पूर्ण होऊन पडद्यावर झळकला. लोकप्रिय झाला... सिनेमाला कमालीचं यश मिळालं...

अवधूत काय, ‘माऊली प्राॅडशन्स’ काय किंवा मराठी चित्रसृष्टी काय; सर्वांसाठीच हा सिनेमा आलेख उंचावणारा ठरला.....!!!


© डॉ. अमेय श्रीराम गोखले.
रत्नागिरी.
9422662772.
dr.ameygokhale@gmail.com

No comments:

Post a Comment